खुळे आणि खिळखिळे..
कोणत्याही परिस्थितीत इम्रान यांना यंदाची सार्वत्रिक निवडणूक लढवू द्यायची नाही, असाच शरीफ-भुत्तो यांचा प्रयत्न आहे. त्यांना सत्तेच्या बोहल्यावर चढवण्यास लष्करही उत्सुक नाही.
इम्रान यांना जवळपास शंभरहून अधिक प्रकरणांमध्ये अडकवता येईल असे पुरावे शाहबाझ शरीफ सरकार आणि तेथील केंद्रीय तपास यंत्रणांकडे आहेत. तरीदेखील आजतागायत त्यांना न्याय्य आणि सनदशीर मार्गाने अटक करणे या मंडळींना जमले नव्हते. यात शरीफ सरकारची हतबलता दिसून येते. तसेच, इम्रान यांना रेंजर्सच्या मार्फत भर न्यायालयातून जवळपास बेकायदा अटकेत टाकणे यातून पाकिस्तानी लष्कराची – विशेषत: लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांची अगतिकताही दिसून येते. इम्रान हे मुनीर यांच्या आधीचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या संमतीने आणि मदतीने गेल्या खेपेस सत्तेवर आले हे जगजाहीर आहे. परंतु कर्तारपूर साहिबमध्ये मोठय़ा संख्येने भारतीय शीख यात्रेकरूंना परवानगी देणे आणि सीमेवर शस्त्रविराम जाहीर करणे या मुद्दय़ांवरून जनरल बाजवा यांनी भारताशी मर्यादित सलोख्याचे प्रयत्न केले हे पाकिस्तानी लष्करातीलच अनेकांना मंजूर नव्हते. पाकिस्तानी लष्करातील ही अघोषित दुफळी इम्रान यांनी हेरली आणि काही अधिकाऱ्यांना हाताशी धरणे नि काहींच्या विरोधात रान उठवणे असले प्रयोग सुरू केले. परंतु या भानगडीत इम्रान यांच्याविरुद्ध विरोधी पक्षीयांची राजकीय एकजूट बळकट करण्याची चाल लष्कराने खेळली. गेल्या वर्षी यातूनच इम्रान यांना तेथील नॅशनल असेम्ब्लीने सत्ताच्युत केले. आज या साठमारीत इम्रान यांचा पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्ष बऱ्याच प्रमाणात आणि पाकिस्तानी लष्कर थोडय़ा प्रमाणात खिळखिळे झाले. परंतु कांगावाखोर राजकारण्यांच्या नाटकी आर्जवांना भुलून अविचारी कृत्ये करणाऱ्या समर्थकांची कोणत्याच देशात कमतरता नाही. त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे, की इम्रान यांच्याविरुद्धच्या कथित अन्यायाच्या विरोधात त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तानातील लष्करी आस्थापनांना लक्ष्य केले आहे. अद्याप तरी या समर्थक-दंगलखोरांवर गोळय़ा चालवण्याची हिंमत तेथील सुरक्षादलांनी दाखवलेली नाही.
आता प्रश्न उपस्थित होतो पाकिस्तानी सरकार आणि तेथील न्यायव्यवस्थेचा. पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि परराष्ट्रमंत्री बिलावल झरदारी भुत्तो यांचे दर्शनही पाकिस्तानी माध्यमांवर झालेले नाही. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गट आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या दोन प्रमुख सत्तारूढ पक्षांचे हे दोन नेते. गतवर्षी इम्रान आणि त्यांच्या पक्षाला हाकलून दिल्यानंतरही दोघांनाही पाकिस्तानात सक्षम राजकीय पर्याय उभा करता आलेला नाही. उलट सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही १४ मे रोजी पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा येथे प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका घेण्याची कोणतीही तयारी झालेली दिसत नाही. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आदल्या दिवशी जाहीर नाराजी व्यक्त करूनही दुसऱ्या दिवशी भरसुनावणीदरम्यान इम्रान यांना उचलले गेले. पाकिस्तानातील मोजक्या पत राहिलेल्या संस्थांमध्ये न्यायालये गणली जात होती. त्यांची पत राहिली असेल वा नसेल, पण त्यांच्याविषयी भीड समूळ नष्ट झाल्याचेच ताज्या घडामोडींनी दाखवून दिले. म्हणजे इम्रान यांच्या राजकीय विरोधकांना त्यांच्यासमोर पर्याय उभा करता येत नाही आणि न्यायालयांना त्यांच्या विरोधात खटलेही चालवता येत नाहीत अशी ही अजब कोंडी आहे. आणि हे सगळे सुरू आहे, पाकिस्तानी अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे अशा वेळी. कोणत्याही परिस्थितीत इम्रान यांना यंदाची सार्वत्रिक निवडणूक लढवू द्यायची नाही, असाच शरीफ-भुत्तो यांचा प्रयत्न आहे. त्यांना सत्तेच्या बोहल्यावर चढवण्यास या वेळी लष्करही अजिबात उत्सुक नाही. पण याचा फायदा घेऊन देशभर मोठी निदर्शने, अस्थैर्य, असंतोष भडकवण्याच्या इम्रान यांच्या मनसुब्यांना यामुळे बळच मिळते. बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या समस्या तेथे उग्र बनल्या आहेतच. पण आता अनेक भागांमध्ये रोजची भूक आणि तहान भागवता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्मद्वेष, शत्रूराष्ट्रभीड, काश्मीर आणि क्रिकेट या चतु:सूत्रीवर रोजी-रोटी मिळत नाही हे पाकिस्तानातील असंख्यांना आता उमगू लागले आहे. त्यांच्या दुर्दैवाने सक्षम सुशासन आणि लोकशाही राबवू शकेल, अशी एकही असामी त्या देशात निपजू शकत नाही. आजवर पाकिस्तानात बहुतेक निदर्शने राजकीय नेत्यांच्या विरोधात व्हायची, त्या वेळी तात्पुरते किंवा शाश्वत स्थैर्य सुनिश्चित करण्याचे काम लष्कराकडून घडायचे. आज लष्कराकडेही नेतृत्व, विश्वास आणि विश्वासार्हतेचा अभाव आहे. राजकीय नेत्यांनी तो केव्हाच गमावला आहे. अशा या अस्थिर, असंतुष्ट पाकिस्तानकडून शाश्वत शांततेची अपेक्षा आपण करणे जवळपास अशक्य आहे. सुविद्य आणि संस्कारी भासणारे इम्रान हे प्रत्यक्षात शरीफ किंवा झरदारींपेक्षाही अधिक खुळे आणि गणंग निघाले. कारण धर्म आणि धर्मवाद्यांचे विष त्यांच्या डोक्यात नको इतके झिरपले. त्यांना राजकीय धोबीपछाड करण्याची नामी संधी शरीफ आणि भुत्तो यांनी केव्हाच गमावली आहे. आज पंजाबसारख्या बालेकिल्ल्यात शरीफ यांच्यासमोर इम्रान यांचे आव्हान आहे, तर सिंधच्या पलीकडे भुत्तो यांची मजलच गेलेली नाही. भारताच्या कुरापती काढत राहणे इतकेच तेथील लष्कर नेतृत्वाचे ईप्सित ठरले आहे. या खुळय़ांच्या खेळात पाकिस्तान राजकीय, आर्थिक आणि नैतिकदृष्टय़ा खिळखिळा बनलेला आहे. अस्थिरतेचा आणि अनैतिकतेचा हा विषाणू भारतात येणार नाही, ही आशा.
No comments:
Post a Comment