आर्थिक भूगोल म्हणजे मानव आणि विविध पर्यावरणीय परिस्थितीमध्ये केल्या जाणाऱ्या मानवाच्या आर्थिक क्रिया यांचा अभ्यास होय.
सर्वप्रथम आपण आर्थिक भूगोल या विषयी चर्चा करूयात. आर्थिक भूगोल म्हणजे मानव आणि विविध पर्यावरणीय परिस्थितीमध्ये केल्या जाणाऱ्या मानवाच्या आर्थिक क्रिया यांचा अभ्यास होय. देशातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्र यामधील सद्यस्थिती त्याबाबतची सरकारी धोरणे, योजना याविषयीची माहिती आवश्यक ठरते. तसेच या घटकाची तयारी करताना चालू घडामोडींची सांगड घालणे आवश्यक आहे.
Q. स्थायी कृषी (permaculture), पारंपरिक रासायनिक शेतीपेक्षा कशी वेगळी आहे?
१. स्थायी शेतीमध्ये एक पीक पद्धतीला प्रोत्साहन दिले जात नाही, पण पारंपरिक रासायनिक शेतीमध्ये एक पीक पद्धतीला प्राधान्य दिले जाते.
२. पारंपरिक रासायनिक शेतीमुळे जमिनीतील क्षारतेत वाढ होऊ शकते, पण स्थायी शेतीमध्ये असे होत नाही.
३. पारंपरिक रासायनिक शेती अर्धशुष्क क्षेत्रांमध्ये करणे शक्य आहे, अशा क्षेत्रांमध्ये काही शेती करणे शक्य नाही.
४. आच्छादन बनवण्याची क्रिया (mulching) स्थायी शेतीमध्ये महत्त्वाची आहे, पारंपारिक रासायनिक शेतीमध्ये आच्छादन करणे आवश्यक नाही.
वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे.
Q. पाम तेलाच्या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या.
१. पाम वृक्ष दक्षिण पूर्व आशियामध्ये नैसर्गिक स्वरूपात आढळतो.
२. पाम तेल लिपस्टिक आणि अत्तर बनवणाऱ्या उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून वापरतात.
३. पाम तेलाचा उपयोग बायो डिझेल उत्पादनामध्ये केला जातो.
वरीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे.
हे आर्थिक भूगोलाशी संबंधित प्रश्न २०२१ च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते.
सामाजिक भूगोल ही मानवी भूगोलाची एक मुख्य शाखा आहे. मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास या शाखेत केला जातो. ही शाखा नव्याने उदयास आलेली आहे. समाजाचा आकार जसजसा विस्तृत होऊ लागला, समाज रचना गुंतागुंतीची बनू लागली आणि सामाजिक समस्यांची संख्या व तीव्रता वाढत गेली तसतसे विचारवंतांनी आपले लक्ष समाजाच्या अभ्यासाकडे वळविले यामधूनच सामाजिक भूगोल ही शाखा विकसित होत गेली. यामध्ये लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल हे दोन महत्त्वाचे उपघटक अभ्यासावे लागतात. लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्याशास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, वितरण, घनता, जन्मदर, मृत्युदर, लिंग गुणोत्तर कार्यकारी गटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश (Demographic Divident) इत्यादी घटकांचे अध्ययन महत्त्वाचे आहे. याबरोबरच भारताचे लोकसंख्या धोरण, भारतातील वंश, जमाती, जाती, धर्म, भाषा इत्यादी बाबींचा आढावा घेणे आवश्यक ठरते. वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या नागरी व ग्रामीण वसाहतींचा अभ्यास केला जातो. भारताचा औद्योगिक विकास झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात स्थलांतर वाढले, ग्रामीण आणि नागरी क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्या. या समस्यांचे अध्ययन करणे आवश्यक ठरते.
अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप लक्षणीयरीत्या वाढला. आपले जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर केला. परिणामी, निसर्गाचा समतोल आढळल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या व या समस्यांची तीव्रता वाढल्यानंतर त्यांची उकल कशी करायची याबाबत विचारमंथन सुरू झाले व त्यामधूनच पर्यावरणाच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले. सर्वसाधारणपणे पर्यावरणातील विविध घटक व समस्यांचा अभ्यास करताना भूगोल, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, वैद्यकशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी अनेक सामाजिक शास्त्रांबरोबर घनिष्ठ संबंध येतो. परिणामी, पर्यावरण भूगोल हे आंतरविद्याशाखीय नवे शास्त्र आहे. नैसर्गिक पर्यावरणात पृथ्वीवरील हवा, पाणी मृदा, खनिजे व खडक, सूर्यप्रकाश, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव या जैविक व अजैविक घटकांचा समावेश होतो.
पर्यावरण भूगोलात पर्यावरणाचे घटक व त्यांचे सहसंबंध निरनिराळ्या परिसंस्था व त्यांच्या प्रक्रिया आंतरक्रिया नैसर्गिक साधन संपत्ती व त्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती व त्यावरील उपाययोजना, मानवनिर्मित समस्या व त्यांचे निराकरण, जैवविविधता व तिचे संरक्षण, पर्यावरणाचे संवर्धन आणि त्याचे व्यवस्थापन व नियोजन अशा विविध घटक विषयांचा अभ्यास अंतर्भूत आहे. जागतिक तापमान वाढ, ओझोन वायूचा विलय, आम्ल पर्जन्य, लोकसंख्या वाढ व त्याचे परिणाम याही गोष्टी या शाखेमध्ये अभ्यासल्या जातात. या बाबी समकालीन घडामोडींच्या प्रकाशामध्ये अभ्यासणे आवश्यक आहे. यूपीएससी पूर्वपरीक्षेत भूगोलाशी संबंधित बहुतांश प्रश्न या घटकावरून विचारले जात आहेत.
द. वातावरण अनुकूल शेतीसाठी (Climate smart agriculture) भारताच्या सज्जतेसंदर्भात खालील वाक्ये विचारात घ्या :
१. भारतामध्ये वातावरण—अनुकूल गाव (Climate smart Village) दृष्टिकोन, आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यक्रम — वातावरण बदल, कृषी व खाद्य सुरक्षा (CCAFS) द्वारे संचालित योजनेचा एक भाग आहे.
२. CCAFS योजना, आंतरराष्ट्रीय कृषी संशोधनाकरिता सल्लागार गटाच्या अधीन संचालित केली जाते,ज्याचे मुख्यालय फ्रान्समध्ये आहे.
३. भारतातील आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (ICRISAT), CGIRA च्या संशोधन केंद्रापैकी एक आहे.
वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे.
या अभ्यास घटकांवर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा रोख माहितीवर असतो; संकल्पनात्मक बाबींचा अभाव दिसतो. म्हणून या घटकांच्या तयारीसाठी परीक्षार्थींनी क्रमिक पुस्तके तसेच संदर्भग्रंथांबरोबरच इंटरनेट, वृत्तपत्रे, डाऊन टू अर्थ, बुलेटीन यांसारखी मासिके इत्यादी स्रोतांचा वापर करणे सयुक्तिक ठरेल.
खूप छान माहिती
ReplyDelete