कर्मवीर एज्युकेशन

कर्मवीर एज्युकेशन या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , MAHESH PATIL 7387125608 .

Motivational Video

Saturday, February 25, 2023

अग्रलेख: दोन भाषणे!

 

अग्रलेख: दोन भाषणे!


पुतिन यांचे भाषण रशियाची राजधानी मॉस्को येथे झाले, तर बायडेन युरोप-खंडातील पोलंड या देशाची राजधानी वॉर्सा येथे जाहीर सभेत बोलत होते.

मंगळवार, २१ फेब्रुवारी २०२३, या एका दिवसात दोन महत्त्वाच्या व्यक्तींची भाषणे झाली. या दोन्ही भाषणांचा ऐतिहासिक संदर्भ एकच होता आणि या दोन्ही भाषणांचा भौगोलिक परीघही एकच होता. ही दोन भाषणे होती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन या दोघांची. पुतिन यांचे भाषण रशियाची राजधानी मॉस्को येथे झाले, तर बायडेन युरोप-खंडातील पोलंड या देशाची राजधानी वॉर्सा येथे जाहीर सभेत बोलत होते. पोलंड हा देश मध्य युरोपातील. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप वैचारिकदृष्टय़ा दुभंगला गेला आणि एका मोठय़ा देशसमूहावर शेजारील बलाढय़ सोव्हिएत रशियाच्या साम्यवादाची पकड बराच काळ राहिली. पोलंड त्यातील एक. महायुद्धकाळात एका बाजूने हिटलर आणि दुसरीकडून स्टालिनच्या ‘लाल सेने’च्या कात्रीत सापडलेल्या या देशास त्याच्या भौगोलिक स्थानामुळे बराच जाच सहन करावा लागला. युद्धपूर्व काळात या देशातील यहुदींचे शिरकाण झाले आणि युद्धानंतर स्वातंत्र्यप्रेमींस साम्यवाद्यांपासून फारकत घेण्याची किंमत मोजावी लागली. परिणामी महायुद्धानंतरही हा देश एक प्रकारची हुकूमशाहीच अनुभवत होता. ही डाव्यांची म्हणजे रशियनांची होती. परिणामी या देशाने विसाव्या शतकातील पहिली खरी स्वतंत्र निवडणूक अनुभवली ती थेट १९९० साली. त्यासाठीही त्या देशातील स्वातंत्र्यप्रेमींस संघर्ष करावा लागला आणि त्यातून लेक वॉलेसा हा साधा बंदर कामगार थेट देशाचा अध्यक्ष बनला. वॉलेसा हे गोदी कामगारांचे नेते होते. त्यांच्या लढय़ास राजकीय यश आले. तेव्हापासून पोलंडने रशियाचे ऐतिहासिक जोखड वागवण्यास नकार दिला आणि तो देश अधिकाधिक युरोपच्या जवळ सरकू लागला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या महत्त्वपूर्ण भाषणासाठी वॉर्साची निवड केली त्याची ही पार्श्वभूमी. पोलीश सीमेपलीकडून पुतिन आणि पोलीश भूमीवरून बायडेन यांच्या या भाषणाचे प्रयोजन एकच होते.

युक्रेन युद्ध. उद्या, २४ फेब्रुवारी रोजी या अकारण युद्धास एक वर्ष होईल. पुतिन यांनी या तारखेस गतसाली या देशावर हल्ला केला. त्यांच्या मते ही साधी ‘लष्करी कारवाई’ होती. तिला एक वर्ष होत असताना त्याची कारणमीमांसा – आणि खरे तर समर्थन – करण्याची गरज पुतिन यांना होती आणि हे युद्ध कसे निष्फळ आहे हे सांगण्याची संधी बायडेन यांना हवी होती. पुतिन यांचे मॉस्कोतील भाषण हे सरकारी, लष्करी अधिकारी अशा समर्थकांसमोर होते. त्यामुळे त्यांनी आपली दोरी ज्याच्या हाती आहे त्या पुतिन यांचे नंदीबैलाप्रमाणे समर्थन करणे अपेक्षितच होते. याउलट बायडेन यांचे भाषण खुल्या वातावरणात झाले. पोलीश, अमेरिकी आणि युक्रेनी असे तीनही देशांचे नागरिक या भाषणास मोठय़ा प्रमाणावर गर्दी करून होते आणि बायडेन यांच्या भाषणास उत्स्फूर्त दाद देत होते. खरे तर बायडेन हे काही त्यांचे पूर्वसूरी बराक ओबामा यांच्याप्रमाणे वक्तृत्वकलेसाठी ओळखले जात नाहीत. त्यांच्या भाषणात वेग आणि आवेग दोन्हींचा अभाव असतो. त्यामुळे त्यांचे वॉर्सा येथील भाषण वीररसयुक्त होते; पण तो वीररस वरून घातलेल्या फोडणीसारखा चढवलेला भासत होता. पण तरीही त्यास उपस्थित दाद देत होते. पण ही दाद बायडेन यांच्या कृत्रिम वीरश्रीयुक्त भाषणाच्या कौतुकापेक्षा त्याआधी होऊन गेलेल्या पुतिन यांच्या भाषणाची रेवडी उडवण्यासाठी अधिक होती. रशियाच्या हल्ल्यामुळे अनेक युक्रेनींनी पोलंडमध्ये स्थलांतर केले आहे. अशांची मोठी गर्दी बायडेन यांच्या भाषणास होती. हे अमेरिकी अध्यक्ष रशियाच्या पुतिन यांच्या विरोधात किती तिखट बोलू आणि त्यानंतर त्यास साजेशी कृती करू शकतात हे ऐकण्यात उपस्थितांना रस होता. बायडेन यांनी त्यांस निराश केले नाही. पण त्याच वेळी स्वत:च्या निर्णयाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याइतकी हिंमत दाखवण्यात पुतिन मात्र कमी पडले. हे युद्ध पाश्चात्त्यांनी आपल्यावर लादले असा हास्यास्पद दावा त्यांनी केला. हे विधान सर्वार्थाने असत्य. त्या ऐवजी; ‘‘युक्रेनचे झेलेंस्की हे अमेरिकेच्या कच्छपि लागत होते; ते मला पटले नाही, म्हणून मी त्यांना रोखण्यासाठी लष्करी कारवाई केली’’ असे पुतिन म्हणाले असते तर त्यांच्या नेतृत्वाची उंची वाढली असती. पण तसे झाले नाही.

याचे कारण युक्रेनने दाखवलेली कमालीची लढाऊ वृत्ती. हे युद्ध आपण चुटकीसरशी संपवू आणि झेलेंस्की आपल्या पायाशी लोळण घेत येतील, अशी पुतिन यांची वर्षांपूर्वीची धारणा होती. ती धुळीस मिळाली. त्यामुळे आता ‘हे युद्ध मी सुरू केले’ असे सांगायला त्यांच्याकडे तोंड नाही. म्हणून मग युद्ध आपल्यावर कसे लादले गेले हा प्रचार आणि कांगावा. पण तो किती फसवा आहे हे रशियातील नागरिकांच्याच खासगी पाहण्यांतून उघड होते. रशियन समाजजीवानवर पुतिन यांची हुकूमशाही पकड आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात उघड बोलणाऱ्यांची तशी संख्या कमी. पण परदेशस्थ रशियन आणि देशस्थ पण बंडखोर रशियन यांच्याकडून पुतिनविरोधी भावना व्यक्त होते. विशेषत: एक वर्षांनंतरही युक्रेनमध्ये पुतिन यांच्या हाती काहीही लागलेले नाही; उलट त्या युद्धात रशियन सैनिकांचे प्राण गमावण्याचे प्रमाण अधिक आहे, हे सत्य आता त्या देशात लपून राहिलेले नाही. त्याचमुळे विविध गुन्ह्यांसाठी तुरुंगात असलेल्या कैद्यांना जुजबी प्रशिक्षण देऊन थेट युद्धभूमीवर धाडण्याचा अघोरीपणा करण्याची वेळ पुतिन यांच्यावर आली. जर्मनी, इंग्लंड आणि मुख्य म्हणजे अमेरिका यांनी युक्रेनच्या रसदपुरवठय़ात या काळात जराही खंड पडू दिला नाही. त्यामुळे प्रचंड विध्वंसास तोंड देण्याची क्षमता युक्रेनियन्स दाखवू शकले. आर्थिक आणि लष्करी अशी दोन्ही प्रकारची मदत युक्रेनला मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने तो देश एकटा पडला नाही. याउलट चीन वगळता या युद्धासाठी पुतिन यांना कोणीही पाठीराखा मिळालेला नाही. परत चीनही हातचे राखूनच पुढे येताना दिसतो. त्या देशासही आर्थिक निर्बंधांची काळजी आहे. त्यामुळे पुतिन एकटे पडलेले दिसतात. आता तर युक्रेनशी दोन हात करणे सुरू ठेवण्यासाठी पुतिन यांस चिनी लष्करी सामग्रीचीही गरज असल्याचे वृत्त आहे. ते खरे असेल तर पुतिन यांचे संकट अधिकच वाढणार हे उघड आहे.

पण या संकटाची कबुली देण्याचा मोठेपणा पुतिन यांच्याकडे नाही. कोणत्याही हुकूमशहाप्रमाणे पुतिन दुराग्रही आहेत. त्यामुळे एक वर्षांच्या युद्धात जमेच्या बाजूपेक्षा खर्चाचीच बाजू वरचढ असल्याचे दिसूनही ते मान्य करण्यास ते तयार नाहीत. त्याच वेळी पुतिन यांची अवस्था पाहून बायडेन यांनी युक्रेनला आणखी मदत दिली जाईल असे जाहीरपणे सांगितले आणि संपूर्ण पाश्चात्त्य देश युक्रेनच्या पाठीशी उभे राहतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पुतिन एकेकाळच्या महासत्तेचे प्रतिनिधी आणि बायडेन विद्यमान एकमेव महासत्तेचे अध्यक्ष. अलीकडे पुतिन हे अनेक देशांतील नेत्यांचे प्रारूप बनलेले आहे. लोकशाहीचा गाभा असलेल्या निवडणुकांच्या मार्गाने सत्ता मिळवल्यावर हुकूमशाही राबवायची हे ते पुतिन प्रारूप. एकाच दिवशी एकापाठोपाठ झालेल्या या दोन भाषणांमुळे या दोघांच्या सध्याच्या अवस्थेचे चित्र समोर येते. त्यातून अधोरेखित होते ते लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व. ते समजून घेण्यासाठी ही दोन भाषणे महत्त्वाची ठरतात.

No comments:

Post a Comment

माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच!

  माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच! विदा संरक्षण, नागरिकांचे खासगीपण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा गां...