कर्मवीर एज्युकेशन

कर्मवीर एज्युकेशन या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , MAHESH PATIL 7387125608 .

Motivational Video

Sunday, January 1, 2023

एकमेवाद्वितीय! पेले: १९४० -२०२२

 

एकमेवाद्वितीय! पेले: १९४० -२०२२


अलौकिक कामगिरी

* पेले यांनी ९२ अधिकृत आंतरराष्ट्रीय सामन्यांत ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना ७७ गोल नोंदवले. ब्राझीलकडून सर्वाधिक गोलचा विक्रम अनेक वर्षे पेले यांच्या नावेच होता. मात्र, नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान नेयमारने पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

* पेले यांनी ब्राझीलमधील नामांकित क्लब सॅण्टोससाठी ६५९ सामन्यांत सर्वाधिक ६४३ गोल झळकावले.

* पेले यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १३६३ सामने खेळताना तब्बल १२८३ गोल नोंदवले. यात ९२ हॅट्ट्रिकचाही समावेश होता.

* ब्राझीलच्या तीन विश्वचषक विजेत्या (१९५८, १९६२, १९७०) संघांत पेले यांचा सहभाग होता. खेळाडू म्हणून सर्वाधिक विश्वचषक विजयांचा विक्रम पेले यांच्याच नावे आहे. 

* सर्वात लहान वयात विश्वविजेतेपद (१७ वर्षे २४९ दिवस) मिळवण्याचा विक्रम पेले यांच्या नावे आहे.

* विश्वचषक स्पर्धेत गोल करणारे पेले सर्वात युवा खेळाडू (१७ वर्षे २३९ दिवस, वि. वेल्स १९५८) आहेत.

* १९९० मध्ये वयाच्या ५०व्या वर्षी एका मैत्रीपूर्ण सामन्यात पेले यांनी ब्राझीलचे कर्णधारपद भूषवले होते.

पेले यांच्या खेळाची वैशिष्टय़े

ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यावर १९५८च्या विश्वचषक स्पर्धेपासून पेले यांचे नाव फुटबॉल विश्वात झळकू लागले. इतर खेळाडूंच्या चालींचा अंदाज घेऊन, चेंडूवर नियंत्रण ठेवत अचूक किक मारण्याची त्यांची क्षमता आजही अनेकांसाठी प्रेरक ठरते. चेंडू पायात खेळवून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलकक्षात धडकून गोल करणे ही पेलेंच्या वैयक्तिक गोलची खासियत. त्यातही गोलकक्षात कॉर्नरवरून किंवा बाजूने हवेतून पास आल्यावर स्वत:ला जागा करून घेत ‘बायसिकल किक’ने गोल करणे ही जणू पेले यांची ओळख झाली. आजही ‘बायसिकल किक’ने गोल झाला की पहिली आठवण पेलेंचीच येते.

विश्वचषक आणि पेले

’विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आणि पेले हे जणू एक समीकरण होते. त्यांनी चार विश्वचषकांमध्ये (१९५८, १९६२, १९६६, १९७०) ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना १४ सामन्यांत १२ गोल केले होते.

’१९५८मध्ये विश्वचषक पदार्पणात केलेल्या कामगिरीमुळे पेले यांना वेगळी ओळख मिळाली. त्यांनी या स्पर्धेच्या चार सामन्यांत सहा गोल नोंदवले होते. यापैकी स्वीडनविरुद्धच्या अंतिम सामन्यातही त्यांनी दोन गोल केले.

’पुढे १९६२च्या स्पर्धेत त्यांना स्नायूची दुखापत झाली आणि त्यांना दोन सामनेच खेळता आले. मात्र, ब्राझीलने विश्वविजेतेपद राखले. १९६६च्या स्पर्धेत ब्राझीलचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. त्यामुळे पेलेंनी निवृत्तीचा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली.

’पेलेंचे मन वळविण्यात यश आले आणि १९७०मध्ये ते पुन्हा विश्वचषक स्पर्धेत खेळले. तेव्हा ब्राझीलने तिसरे विजेतेपद पटकावले.

मैदानाबाहेरचे पेले

पेले १९९४मध्ये युनेस्कोचे शांतता राजदूत होते. त्यानंतर १९९५ ते १९९८ ते ब्राझीलमध्ये क्रीडामंत्री राहिले. ब्राझील फुटबॉल संघटनेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्यांनी एक कायदाच केला. तो ‘पेले लॉ’ म्हणून ओळखला गेला. पेले ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक होते, पण त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यांनी अनेक यशस्वी माहितीपटात आणि लघुपटात काम केले. त्यांना संगीताचीही जाण होती. त्यांनी अनेक संगीतमय रचनाही केल्या. त्यांनी १९९७मध्ये प्रसारित झालेल्या पेले या चरित्रपटाच्या संगीत नियोजनाचीही जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी अनेक प्रसिद्ध आत्मचरित्रेही प्रकाशित केली.

No comments:

Post a Comment

माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच!

  माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच! विदा संरक्षण, नागरिकांचे खासगीपण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा गां...