मेसी-मोहोराची महत्ता!
खेळाची वैश्विकता पारलौकिकतेच्या उंचीवर पोहोचून जगण्याच्या व्यावहारिक मर्यादांवर कशी मात करू शकते याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे फुटबॉल विश्वचषकाचा अर्जेटिना आणि फ्रान्स यांच्यातील अंतिम सामना. या श्वासरोधी लढतीत अर्जेटिनाचा विजय आणि त्यानंतरची त्या देशातील उत्सवयात्रा म्हणजे या सत्याचा पुढील आविष्कार. प्रचंड आर्थिक संकटाने ग्रासलेल्या, चलनवाढीने पिचलेल्या आणि काहीही आशादायक घडत नसल्याने कावलेल्या आणि म्हणून मन मारून जगणाऱ्या अर्जेटिनियन्सना या विजयाने जगण्याचे प्रयोजन दिले. फुटबॉल हाच श्वास आणि ध्यास असलेल्या ब्राझील, उरुग्वे, अर्जेटिनादी देशांत विश्वचषकप्राप्ती म्हणजे सर्वोच्च सुखाची परमावधी. आणि ती अनुभूती देणारा खेळाडू त्या देशासाठी ‘वार्ता विघ्नाची’ दूर करणारा ‘सुखकर्ता, दु:खहर्ता’च जणू. अर्जेटिनेतर क्रीडाप्रेमींसाठी लिओनेल मेसी हा कदाचित केवळ आनंददाता असेल. पण अर्जेटिनासाठी मात्र आनंद आणि राष्ट्रीय अस्मिता या दोहोंचे प्रतीक ठरतो. अशा वेळी हे केवळ एखाद्या खेळातील जगज्जेतेपद इतकाच या विजयाचा अर्थ राहात नाही. तो समजून घेण्याआधी या खेळाची वैश्विकता लक्षात घ्यावी लागेल आणि त्यावरील भाष्य खेळ मैदानापलीकडे न्यावे लागेल.
फुटबॉलला ब्राझीलमध्ये ‘जोगो बोनितो’ असे संबोधले जाते. याचा अर्थ सुंदर खेळ! ब्राझीलच्या प्रभावामुळे हीच या खेळाची जगन्मान्य परवलीची उपाधी. या खेळाचे सौंदर्य त्याच्या मैदानी स्वरूपात आहे. पण मैदानी असूनही हा खेळ क्रिकेट किंवा हॉकीसारखा साधन-बंबाळ नाही. ताकद आणि नजाकतीचा मिलाफ असूनही हा खेळ टेनिस किंवा बॅडिमटनप्रमाणे वैयक्तिक स्वरूपाचा नाही. बॉक्सिंग किंवा कुस्तीसारखी या खेळात (तशी) शारीर झटापट नाही. परंतु सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे हा खेळ, साओ पावलोची झोपडपट्टी किंवा ब्युनॉस आयर्सच्या गल्ल्या, आफ्रिकेतली माळराने किंवा अरबस्तानातली वाळवंटे असा कुठेही; तसेच केरळ-कोलकात्यामधला पाऊस, मोरोक्को-इराणमधले कडक ऊन, मिलान-म्युनिचमधली कडाडती थंडी असा केव्हाही खेळला जाऊ शकतो. दोन बाजूंना दोन खांब आणि चिंध्या किंवा रबराचा चेंडू अशा किमान सामग्रीच्या आधारे तो खेळता येऊ शकतो. हेच ते वैश्विक ‘अपील’! पण त्याच्या या मूलभूत गुणांमुळेच फुटबॉलला इतकी व्यापक जगन्मान्यता मिळते. ब्राझील, फुटबॉल आणि पेले हे त्रिमितीय समीकरण या देशात वर्षांनुवर्षे ऐकले- वाचले जात होते. पण फुटबॉलचे रंग ‘पाहण्या’ची संधी इथल्यांना मिळाली, १९८६ मध्ये. त्या वर्षी मेक्सिकोत झालेल्या विश्वचषक स्पर्धेचे प्रथमच संपूर्ण प्रक्षेपण आपल्याकडे ‘दूरदर्शन’वरून दाखवले गेले. फुटबॉलमधील अनेकविध शैली, डावपेचांची ओळख ‘याचि डोळा’ भारतीयांना घडली. ब्राझील, इटली, जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्स या बलाढय़ देशांचे खेळाडू घराघरात चर्चिले जाऊ लागले. पण यातही भारतीयांना सर्वाधिक भावला दिएगो अर्माडो मॅराडोना आणि त्याचा युवा, ऊर्जावान अर्जेटिना संघ. मॅराडोनाचा वेग आवरणे झेपेना, तसे विशेषत: युरोपियनांनी त्याला वाट्टेल त्या भल्या-बुऱ्या मार्गानी रोखण्याचा प्रयत्न केला. बचावफळी भेदत धावणारा मॅराडोना, दांडगट युरोपियनांनी पाडल्यानंतर कळवळणारा मॅराडोना इथल्यांचाही नायक बनला. त्याचा तरुण संघ प्रस्थापितांची सद्दी मोडून काढत आगेकूच करू लागला, तसे अर्जेटिना हे नाव घरोघरी घेतले जाऊ लागले. निखळ फुटबॉलचा आनंद देणाऱ्या मॅराडोनाला त्याच्या पाप-पुण्यासकट आम्ही स्वीकारले. फुटबॉलची ही संस्कृती लॅटिन अमेरिकी. दुसरी संस्कृती अर्थात युरोपीय. परंतु युरोपीय देशांच्या वसाहतवादाची झळ काही शतके सोसलेल्या आशिया वा आफ्रिकेतील कित्येक देशांना, फुटबॉलच्या मैदानावर युरोपियनांना तोडीस तोड ठरलेले लॅटिन अमेरिकी संघ अधिक आपलेसे वाटणे स्वाभाविकच. भारतासह आशिया व आफ्रिकी देशांचा विशाल समूह म्हणजे व्यवस्था वा शिस्तीपेक्षा दमदारपणा आणि उत्स्फूर्ततेला महत्त्व देणारा. या गुणांचा प्रभाव ब्राझील आणि अर्जेटिनासारख्या अनेक लॅटिन अमेरिकी देशांमध्येही दिसून येतो आणि तरीही हे देश समृद्ध व सुस्थिर युरोपीय देशांना अनेकदा भारी पडत. यातून निर्माण झालेला समतोल या खेळाची लोकप्रियता वृध्दिंगत करण्यास साभूत ठरला. नवीन सहस्रकाच्या सुरुवातीलाच ब्राझीलने (२००२) जगज्जेतेपद मिळवल्यानंतर सातत्याने युरोपीय देश जगज्जेते ठरू लागले, तेव्हा हा समतोल ढासळू लागला. मात्र याच काळात लिओनेल मेसीचा उगम झाला!
मॅराडोनाचा अर्जेटिना आणि अर्जेटिनाचा मेसी. त्यामुळे कधी काळी हाच मेसी अर्जेटिनाला आणि लॅटिन अमेरिकेला फुटबॉलचे गतवैभव पुन्हा मिळवून देईल, अशी आशा केवळ अर्जेटिनातील नव्हे, तर भारतासारख्या देशातील त्याच्या लक्षावधी चाहत्यांनाही लागून राहिली होती. तसे पाहायला गेल्यास मेसी हे सर्वस्वी अर्जेटिनाच्या व्यवस्थेचे फळ नाही. गेली काही दशके हा देश आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करत आहे. नवीन सहस्रकाच्या सुरुवातीस अनेक कुटुंबांनी अर्जेटिना सोडून इतरत्र स्थलांतर केले. मेसीचे कुटुंब त्यांपैकीच एक. स्पेनमध्ये बार्सिलोना फुटबॉल अकादमीत तो दाखल झाला आणि एक परिपूर्ण फुटबॉलपटू म्हणून उदयाला आला. तो बार्सिलोना क्लबकडून खेळू लागला आणि पोर्तुगाल-मँचेस्टर युनायटेडच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणे क्लब फुटबॉल गाजवू लागला. त्याची रोनाल्डोशी स्पर्धा ही क्लब अजिंक्यपदांच्या परिप्रेक्ष्यात पडताळली- आस्वादली जाऊ लागली. २००६ पासून तो विश्वचषक स्पर्धामध्ये अर्जेटिनाकडूनही खेळू लागला. मात्र तेथील कामगिरी आणि क्लब फुटबॉलमधील त्याची झळाळती कारकीर्द यांचा काहीच मेळ जुळत नव्हता. मेसी मॅराडोनाचा वारसदार म्हणवला जाऊ लागला, त्या वेळी अर्जेटिनातले चाहते एकच मुद्दा उपस्थित करत – याने मॅराडोनासारखे जगज्जेतेपद कुठे आणलेय? क्लब, कॉर्पोरेट यांच्या अभद्र युतीतून सार्वकालिक महानतम (‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ किंवा ‘गोट’) बिरुदाचा काहीसा उठवळ खेळ सुरू झाला, त्याही वेळी पारंपरिक चाहत्यांनी जगज्जेतेपदाचा आग्रह लावून धरला. मेसी अर्जेटिनाचा होण्याआधीही जगाचा होता. क्लब फुटबॉलमध्ये सारे काही मिळवल्यानंतरच्या काळातच तो अर्जेटिनाच्या आकाशी-पांढऱ्या पोशाखात काही तरी भरीव करून दाखवण्याची उमेद बाळगू लागला. पण मेसीची महानता म्हणजे या स्वप्नाचा त्याने वर्षांनुवर्षे पाठपुरावा केला. इतक्या दृढनिश्चयी पाठपुराव्याची आणि अखेरीस सर केलेल्या यशोशिखराची फार थोडी उदाहरणे खेळाच्या इतिहासात आढळतील. कतार विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीचा सौदी अरेबिया विरुद्धचा सामना धक्कादायकरीत्या गमावल्यानंतर मेसीचा अर्जेटिना आणि अर्जेटिनाचा मेसी जणू रंग बदलल्यासारखे, झपाटल्यासारखे खेळले. त्यामुळेच अंतिम लढतीत फ्रान्ससारखा मुरब्बी संघ वारंवार पुनरागमन करत असतानाही मेसीची एकाग्रता, ऊर्जा, भूक तसूभरही ढळली नाही. त्याच्या या अविरततेला सलाम!
मेसी आणि अर्जेटिनाच्या दिग्विजयामुळे लॅटिन अमेरिकी नेत्रसुखद, अस्सल शैलीला गेली काही वर्षे लागलेले ग्रहण सुटले. हा परिणाम ब्राझीलसारख्या बलाढय़ फुटबॉल घराण्याला साधता आला नाही. पण मॅराडोना आणि मेसीच्या अर्जेटिनाने तो चमत्कार करून दाखवला. याच प्रभावामुळे जर्मनीसारखा संघही प्रवाही खेळून २०१४ मध्ये आणि फ्रान्सचा संघ २०१८ मध्ये जगज्जेता ठरला. किलियन एम्बापे हा फ्रान्सचा खेळाडू मेसीच्या तोडीस तोड या स्पर्धेत आणि अंतिम सामन्यात चमकला, त्याच्यावरही मेसी, अर्जेटिना आणि लॅटिन अमेरिकी शैलीचा प्रभाव आहे हे नाकारता येत नाही. फुटबॉल हा अब्जावधी डॉलरचा उद्योग बनला आहे. पण अखेरीस तो खेळ आहे आणि समस्या-संकटांचा विसर पडायला लावणारी करमणूक हे त्याचे प्रधान उद्दिष्ट असते. एखादा सुंदर सिनेमा, एखादी सुश्राव्य संगीतिका, एखादे उत्कट पुस्तक वाचल्यानंतरचा तजेला माणसाला चार घटका अधिक उमेद आणि उत्साह देऊन जातो. मेसीच्या फुटबॉलमध्ये तशी जादुई ताकद आहे. त्या जादूवर जगज्जेतेपदाची मोहोर लागल्यामुळे आनंदलेल्यांची मोजदाद करणे अशक्य. देश-भाषा-धर्म या सर्व क्षुद्र सीमा ओलांडणारा हा मेसी-मोहोराचा दरवळ बराच काळ राहील. हीच फुटबॉलची खेळ म्हणून महत्ता.
सर संपूर्ण फूटबॉल विश्वचषक व त्याचा उगम ते आजपर्यंत सर्व डोळ्यासमोर तरळून गेले.सर्वांनी आवर्जून वाचावा असा लेख आहे.
ReplyDelete