चीन : बिथरलेला की बावचळलेला?
अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या सभापती नॅन्सी पलोसी यांच्या तैवानभेटीनंतर बिथरलेल्या चीनने तैवानच्या भोवताली जो युद्धखोर खेळ आरंभला आहे, त्यामुळे जगभरातील बहुतांना धास्ती वाटणे स्वाभाविक आहे. तैवानला जरब बसवण्यासाठी आणि पलोसी-भेटीविषयी संताप व्यक्त करण्यासाठी तैवानच्या समुद्रात क्षेपणास्त्रे ओतणे, तैवानच्या हवाईहद्दीची अजिबात तमा न बाळगता त्यांच्या आकाशात लढाऊ विमाने घोंघावणे, युद्धनौकांचे कोंडाळे करून नाविक कोंडीची तयारी करणे या कृती एखाद्या बिथरलेल्या, मदमस्त गजराजाची आठवण करून देतात. सहसा असा गजराज आक्रमण करण्याऐवजी आक्रमकता दाखवण्यावर भर देतो. त्याचे अजस्र आणि विक्राळ स्वरूप पाहून समोरचे बहुतांश गळपटतात. पण चीनच्या सध्याच्या आक्रमक चाळय़ांसमोर तैवान तूर्त भेदरलेला नाही हे नक्की. अमेरिकेचा पाठिंबा हे त्याचे कारण नाही. अमेरिकेने कितीही पाठिंबा दिला, तैवानच्या मदतीसाठी लष्कर वा लष्करी सामग्री पाठवली, तरी चीनने पूर्ण ताकदीनिशी हल्ला चढवल्यास तो देश फार दिवस टिकाव धरू शकत नाही. पण तैवानचा निर्धार अमेरिकी मदतीपेक्षाही लोकशाही मूल्यांवरील विश्वासाने अधिक दृढ झालेला आहे. या लोकशाही मूल्यांचा चीनच्या आधिपत्याखाली आल्यानंतर कसा पाचोळा उडतो, हे हाँगकाँगच्या उदाहरणावरून दिसून आलेच आहे. तैवान हा आज अग्रणी उद्योगप्रधान आणि उच्च तंत्रज्ञानाभिमुख देश आहे याचे श्रेय तेथील लोकशाहीला द्यावे लागेल. लोकशाही असेल तर उद्योग आणि तंत्रज्ञानातील प्रगती साधणे शक्य होते याचे तैवान हे उत्तम उदाहरण आहे. याउलट या लोकशाहीमुळेच चिनी नेतृत्व बावचळते हे वेळोवेळी दिसून आले आहे. यातूनच तिबेट, क्षिनझियांग आणि आता हाँगकाँगमध्ये विधिनिषेधशून्य दडपशाही आणि भारत सीमा, दक्षिण चीन समुद्र व आता तैवानच्या समुद्रात दंडेली हे प्रकार सुरू झाले आहेत. या सगळय़ामागे एक संगती आहे. लोकशाही नसूनही लोकभावनेचा रेटा क्षी जिनपिंग यांच्या तथाकथित पोलादी नेतृत्वाला जाणवू लागला आहे. करोनाचा उद्भव चीनमध्ये झाला आणि मध्यंतरीच्या काळात त्या महासाथीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्यागत वागणारा हा देश अगदी अलीकडे करोनाच्या तिसऱ्या वा चौथ्या लाटेत मात्र हतबल झाला. शांघायसारखे आर्थिक राजधानीचे शहर काही आठवडे कडकडीत बंद केल्यामुळे चीनमधील जनता प्रक्षुब्ध झाली. ‘झिरो कोविड’ किंवा ‘शून्य रुग्ण’ धोरण चीन राबवतो कारण याव्यतिरिक्त साथनियंत्रणाचा कोणताही शास्त्रीय उपाय त्या देशाला जमलेलाच नाही. कुचकामी लशींमुळे करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करता आला नाही. या बलाढय़ देशाच्या पोलादी अध्यक्षाला करोनाकाळात देश सोडून कुठे जाण्याइतपत हिंमतही बराच काळ दाखवता आलेली नव्हती! या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट पक्षाचे पंचवार्षिक अधिवेशन समीप आले आहे आणि तेथे तिसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून येण्यासाठी जिनपिंग महोदय आसुसले आहेत. स्थानिक धोरणांचा विचका झाला असला, धोरणांअभावी बहुसंख्य जनता प्रक्षुब्ध असली, तरी राष्ट्रबलाची मात्रा पाजली की या प्रक्षुब्धांपैकी बहुतांचे मन:परिवर्तन होते हे सूत्र जिनपिंग यांसारख्या मुरलेल्या राष्ट्रप्रमुखांना पुरेसे ठाऊक आहे. यातूनच गेली विशेषत: तीन वर्षे जिनिपग यांच्या आदेशाबरहुकूम चीनचा मदमस्त हत्ती झुलत आहे आणि येणाऱ्या-जाणाऱ्यावर धावून जात आहे. त्याच्या आवेशाला भीक न घालण्याचे अमेरिका आणि तैवानचे धोरण अनुकरणीय असेच.
No comments:
Post a Comment