कर्मवीर एज्युकेशन

कर्मवीर एज्युकेशन या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , MAHESH PATIL 7387125608 .

Motivational Video

Tuesday, August 2, 2022

‘ईडिंबा’ राज्य जिंकून देतो त्याची गोष्ट…

 

‘ईडिंबा’ राज्य जिंकून देतो त्याची गोष्ट…


आटपाट नगराच्या या गोष्टीचे साम्य महाराष्ट्राशी भासल्यास तो योगायोग मानावा काय, हे वाचकांनीच ठरवावे.

 आपटानगर म्हणजे स्वप्नांचं शहर. नावातच राष्ट्र असणाऱ्या एका महान राज्याची तितकीच महान अशी ही राजधानी. त्या महान राज्याचा कार्यप्रमुख हाच आटपाट नगरचा राजा होता. आटपाटनगर म्हणजे त्याचा जीव की प्राण. एके दिवशी मात्र हे शहर अचानक हादरलं, झालं काय तर आटपाट नगरचा राजा आणि त्याचा सेनापती यांच्यात वितुष्ट आल सेनापतीने विद्रोह केला आणि शेजारच्या कमलापूरच्या राज्यात सर्व बंडखोर सरदारांना घेऊन गेला. या कमलापूर राज्याचा कर्ताधर्ता हा एकेकाळी आटपाटनगरच्या राजाचा मित्र होता .पण सत्ताकारणातून या दोघांचं बिनसलं आणि दोघांनी वेगळ्या चुली मांडल्या.

तिकडे कमलपूरच्या राजाने प्रचंड पराक्रम गाजवून (आणि त्याची वाजवीपेक्षा जास्त जाहिरातबाजी करून) अख्खं भारतवर्ष आपल्या प्रभावाखाली आणलं होतं. उत्तर दिग्विजय करून तो आता दक्षिण दिग्विजयासाठी आसुसलेला होता. पण आटपाटनगरचा राजा काही त्याला दाद देत नव्हता. कमलपूरच्या राजाला शह देण्यासाठी त्यानं दोन पुरोगामी वगैरे असलेल्या ‘शाह्यां’ना आपल्या बाजूनं वळवलं. तसं ह्या दोन्ही शाह्या आणि आटपाटनगरचा राजा यांच्यात प्रचंड वितुष्ट होतं. कधीकाळी आटपाटनगरच्या राजानंच त्यांचं ‘शाह्या’ असं (म्हणजे आदिलशाही, निजामशाही वगैरे) वर्णन केलं होतं.

पण ‘उत्तरेकडून आक्रमण झाले तर दक्षिणेच्या तिन्ही शाह्यांनी एकत्र येऊन लढायलाच हवे’ असं आटपाटनगरच्या आराध्यदेवानं चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलं होतं. त्यामुळे कमलपूरच्या राजाला रोखायचं या धोरणावर तिन्ही सत्ता एकत्र आल्या आणि कमलपूरच्या राजाविरुद्ध त्यांनी ‘महाआघाडी’ उघडली.

या तिन्ही सत्तांना एकत्रितपणे मैदानी युद्धात हरवणं ही अवघड गोष्ट होती. पण कमलपूरचा राजा मात्र हट्टाला पेटला होता. त्यामुळे त्याने विदर्भ प्रांताचा मातब्बर सरदार देवेनरायला आटपाटनगरवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं. देवेनराय हा प्रचंड महत्त्वाकांक्षी पण तितकाच मुरब्बी सरदार. आटपाटनगर जिंकण्यासाठी त्यानं धक्कातंत्राचा वापर करून ‘भल्या पहाटे’ आक्रमण केलं. पण आटपाटनगर ‘अजित’ राहिलं आणि देवेनरायला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे देवेनराय प्रचंड संतापला. त्याने जाता जाता आटपाटनगरच्या सरदारांना ‘मी पुन्हा येईन’ असं निक्षून सांगितलं.

तथापि या तिन्ही सत्तांना एकत्र हरवणं अशक्यप्राय आहे हे त्याला कळून चुकलं होतं. पण देवेनराय मोठा धूर्त. त्यानं थंड डोक्याने विचार केला आणि कमलपूरच्या राजाला निरोप धाडून ‘ईडिंबा’ नावाच्या राक्षसाला मदतीसाठी पाठवण्याची विनंती केली. हा ईडिंबा म्हणजे मोठा विचित्र राक्षस. चिन्यांकडे ड्रॅगन असतो त्याच्या अगदी विरुद्ध गुणधर्म असणारा असा हा ईडिंबा. म्हणजे तोंडातून आग ओकून सर्व काही वितळवण्याऐवजी हा सगळं काही ‘गोठवायचा’. अर्थात त्यामुळं होणारं नुकसान प्रचंड असायचं. तर अशा या ईडिंबानं देवेनरायच्या डावपेचांनुसार धडाधड हल्ले करायला सुरुवात केली. आधी त्याने दोन शाह्यांना लक्ष करून त्यांच्या सुभेदारांवर हल्ले केले. हा आटपाटनगरच्या राजासाठी एक निर्वाणीचा इशारा होता. तरीही राजा गाफीलच राहिला. मग मात्र ईडिंबानं चौफेर हल्ले करायला सुरुवात केली.

ईडिंबा राक्षसाचं रौद्ररूप पाहून सगळे सरदार चिंतेत पडले. याला थांबवलं नाही तर हा आपलं सर्वस्व गोठवू शकतो हे त्यांना कळून चुकलं. आपला राजा काहीतरी करेल या आशेने ते राजाकडे पाहू लागले. पण आपल्या भक्कम तटबंदीच्या बाहेर येऊन सरदारांना प्रोत्साहन देण्यात आटपाटनगरचा राजा कमी पडत होता. धास्तावलेल्या सरदारांनी शेवटी आपल्या सेनापतीकडे धाव घेतली आणि यातून मार्ग काढण्याची विनंती केली. आता हाच एक नाथ आपल्याला वाचवू शकेल अशी त्यांची आशा होती.

तशी सेनापतीला सुद्धा ईडिंबाची चिंता होतीच. पण आश्चर्य म्हणजे ईडिंबानं त्याला जराही धक्का लागू दिला नव्हता. त्याच्यावर हल्ला करायची गरजच नव्हती, कारण धूर्त देवेनरायनं आपल्या अमोघ कौशल्यानं सेनापतीस मैत्रीच्या पाशात जखडून ठेवलं होतं.

आता देवेनराय फक्त संधीची वाट पाहत होता आणि लवकरच ती संधी आली. एके दिवशी सरंजामदारांच्या प्रतिनियुक्तीवरून आटपाटनगरचा राजा आणि सेनापती यांच्यात खटके उडाले. झालं, सेनापतीला एवढं निमित्त खूप होतं. त्यानं विद्रोह केला आणि आपल्या आश्रयाला आलेल्या सर्व सरदारांना घेऊन कमलपूरच्या राज्यात गेला. आटपाटनगरात हाहाकार उडाला. राजाने आपल्या सेनापतीला सर्व सरदारांना घेऊन परत फिरण्याचं फर्मान बजावलं.

पण सेनापतीनं ते धुडकावून लावलं. देवेनरायच्या मदतीनं त्यानं स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. नौबती झडल्या आणि युद्धाचे नगारे वाजू लागले. आटपाटनगरचा राजा मोठ्या संकटात सापडला. देवेनरायसारखा शक्तिशाली सरदार, त्याच्यामागे असणारी कमलपूरची प्रचंड ताकद, आपल्या सर्व खाचाखोचा माहीत असलेला सेनापती आणि वर ईडिंबा या सर्वांपुढे तो हतबल होता. अपुऱ्या शिबंदीनिशी आपण या प्रचंड ताकदीसमोर टिकू शकणार नाही हे त्यानं पुरेपूर ओळखलं आणि सेनापतीचा राज्यकारभाराचा अधिकार मान्य करून त्याला शुभेच्छा दिल्या. सेनापतीनेही मग राजाचा आदर ठेऊन आपली तलवार म्यान केली.

गोष्ट इथंच संपली नाही…

मग राजानं उरल्यासुरल्या निष्ठावंतांची पुनर्बांधणी करायला चालू केली. राज्य गेलं तरी राजधानी अजूनही आपल्याकडेच राहिली यामुळे राजा तसा थोडा निश्चिंत होता. इकडे सेनापतीसुद्धा राज्यकारभार आपल्या हातात आल्यामुळे खूश होता. आटपाटनगरच्या राजाला धडा शिकवला म्हणून कमलपूरचा राजासुद्धा खूश होता. ईडिंबाचा फेरा चुकला म्हणून सर्व सरदारांनी सुटकेचा निश्वास टाकला. तर सलग अडीच वर्षांच्या मोहिमेनंतर आपल्याला आता थोडी विश्रांती मिळणार म्हणून ईडिंबाही खूश होता.

सगळीकडे आनंदीआनंद सुरू असताना देवेनराय मात्र अलिप्त होता. आटपाटनगर जोपर्यंत राजाकडे आहे तोपर्यंत राजा आणि सेनापती पुन्हा एकत्र येऊ शकतात हे त्याला पक्कं ठाऊक होतं. त्याच्या डोक्यात आता मोठं काहीतरी शिजत होतं. सगळे आपापल्या सुखाचे सोहळे करत असताना हा महत्त्वाकांक्षी सरदार आटपाटनगरच्या नकाशावर खाणाखुणा करत होता. आटपाटनगरच्या राजावर लवकरच एक मोठं संकट येणार होतं.





No comments:

Post a Comment

माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच!

  माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच! विदा संरक्षण, नागरिकांचे खासगीपण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा गां...