कर्मवीर एज्युकेशन

कर्मवीर एज्युकेशन या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , MAHESH PATIL 7387125608 .

Motivational Video

Thursday, June 9, 2022

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घोषित ; १८ जुलैला मतदान, २१ जुलैला मतमोजणी

 

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घोषित ; १८ जुलैला मतदान, २१ जुलैला मतमोजणी


 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. १५ व्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होईल. नवनियुक्त राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील. या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोिवद यांची मुदत २४ जुलै रोजी संपत असून त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली जाण्याची शक्यता नाही. नवे राष्ट्रपती बिनविरोध निवडले जावेत यासाठी केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) प्रयत्न केले जाऊ शकतात. मात्र विरोधकांकडून उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची अधिक शक्यता असल्याने दोन्ही बाजूंकडील संभाव्य उमेदवारांबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभेत प्रचंड बहुमत असलेल्या भाजपकडून ‘एनडीए’च्या उमेदवाराची सहमतीने निवड केली जाईल. विरोधकांमध्ये मात्र काँग्रेस तसेच, अन्य प्रादेशिक पक्षांमध्ये असलेल्या मतभेदामुळे सहमतीच्या उमेदवाराची निवड करणे जिकिरीचे होऊ शकते.

धक्कातंत्राची शक्यता 

भाजपकडून यावेळीही उमेदवार निवडीत धक्कातंत्र वापरले जाऊ शकेल. गेल्या निवडणुकीत रामनाथ कोिवद यांना उमेदवारी देऊन भाजपने विरोधकांना अचंबित केले होते. कोिवद हे बिहारचे तत्कालीन राज्यपाल होते व ते अनुसूचित जातीतून येतात. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात अनुसूचित जातीतील मीरा कुमार यांना उमेदवारी दिली होती. कोविंद यांना एकूण मतमूल्यांपैकी ६५.६५ टक्के म्हणजे ७,०२,०४४ मतमूल्य मिळाले होते. 

यादी लगेच अद्ययावत

१५ राज्यांतील राज्यसभेच्या ५७ जागापैकी १६ जागांवर शुक्रवारी मतदान होणार असून ४१ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व हरियाणा चार राज्यांमध्ये जागांच्या संख्येपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राज्यसभेतील सदस्यांचे मतमूल्य महत्त्वाचे असल्याने राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच निवडणूक आयोगाकडून राज्यसभेतील ‘मतदारां’ची यादी अद्ययावत केली जाईल.

आयोगाने दिलेल्या पेननेच मतदान

प्रत्येक आमदार व खासदाराला निवडणूक आयोगाने दिलेल्या पेननेच मतदान करावे लागेल.

अन्य पेनचा वापर केल्यास मत अवैध मानले जाईल. राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी होणाऱ्या मतदानासाठीही आमदारांना आयोगाकडून पेन दिले जाणार आहे. राष्ट्रपती पदासाठी होणारी निवडणूक गुप्त पद्धतीने होणार असून राजकीय पक्षांना आमदार व खासदारांसाठी व्हीप काढता येणार नाही.

निवडणूक प्रक्रिया कशी?

* राज्यांचे व दिल्ली तसेच, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेतील सदस्य व संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात. सर्वाधिक मतमूल्य मिळालेल्या उमेदवाराला केंद्रीय निवडणूक आयोग विजयी घोषित करतो.

*  लोकसंख्येनुसार प्रत्येक राज्यातील आमदाराचे मूल्य ठरते. महाराष्ट्रातील आमदाराचे मूल्य १७५ असून विधानसभेत २८८ सदस्य आहेत. त्यामुळे राज्याचे एकूण मतमूल्य ५०,४०० आहे.

*  उत्तर प्रदेशमधील आमदाराचे मूल्य सर्वाधिक २०८ असून राज्याचे एकूण मतमूल्य ८३,८२४ आहे. सर्व राज्यांचे एकूण मतमूल्य ५ लाख ४३ हजार २३१ इतके आहे.

राज्यांच्या मतमूल्यांच्या आधारे संसदेतील सदस्यांचे मतमूल्य ठरते. लोकसभेत ५४३ सदस्य असून राज्यसभेत २३३ सदस्य आहेत. राज्यसभेतील १२ नियुक्त सदस्यांना मतदानात भाग घेता येत नाही.

*  दोन्ही सभागृहातील प्रत्येक खासदाराचे मतमूल्य ७०० इतके आहे. त्यामुळे राज्य विधानसभेतील सदस्यांचे मतमूल्य व संसदेतील सदस्यांचे मतमूल्य मिळून राष्ट्रपतीपदासाठी एकूण मतमूल्य १० लाख ८६ हजार ४३१ इतके असेल.

४ हजार ३३ आमदार व ७६६ खासदार मिळून एकूण ४८०९ ‘मतदार’ राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतील.

चुरशीची निवडणूक

राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, पश्चिम बंगाल, तामीळनाडू, पंजाब, केरळ आदी राज्यांमध्ये भाजपविरोधी राजकीय पक्षांची सरकारे आहेत. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा भंग झालेली आहे. राष्ट्रीय तेलंगण समितीची भाजपवरील नाराजी, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल (सं) व भाजपमधील वाढणारी दरी असे अनेक घटक राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये ‘सक्रिय’ होऊ शकतील. त्यामुळे २०१७ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली आहे.

निवडणुकीचा कालावधी

*  निवडणुकीसाठी अधिसूचना- १५ जून

* उमेदवारी भरण्याचा अखेरचा दिवस- २९ जून

* उमेदवारी अर्जाची छाननी- ३० जून

* अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस- २ जुलै

* मतदान-१८ जुलै

* मतमोजणी- २१ जुलै

No comments:

Post a Comment

माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच!

  माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच! विदा संरक्षण, नागरिकांचे खासगीपण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा गां...