कर्मवीर एज्युकेशन

कर्मवीर एज्युकेशन या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , MAHESH PATIL 7387125608 .

Motivational Video

Tuesday, March 1, 2022

धोरण आणि धारणा!

 ‘पुतिन यांच्यामुळे आपले भले होत असेल तर कशाला बोला त्यांविरोधात’ अशी मध्यममार्गी लबाडीच जर्मन राजकारण्यांनी मुत्सद्देगिरी म्हणून खपवलेली नाही..

‘‘धारणा बदलली की धोरणात बदल करणे अपरिहार्य असते’’ असे अत्यंत सैद्धांतिक म्हणावे असे विधान जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अ‍ॅनालेना बेअरबॉक यांनी त्या देशाच्या बुंडेश्टॅगमध्ये –  म्हणजे त्यांच्या संसदेत – करणे यास फार महत्त्व आहे. याचे कारण बेअरबॉक या ‘ग्रीन पार्टी’च्या. पर्यावरण या विषयास केंद्रस्थानी ठेवून आपली धोरणे आखणाऱ्या या पक्षाचा अर्थातच युद्ध, शस्त्रास्त्र पुरवठा यास अंगभूत विरोध. पण रशियाचे निरंकुश रक्तपिपासू अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनबाबत जी दांडगाईची कृती केली ती पाहता आपल्या सैद्धांतिक विचारधारेस मुरड घालण्याची गरज बेअरबॉक यांस वाटली. विचारधारा वा धोरणे इतिहासाच्या साच्यात कैद नसतात. नसायला हव्यात. वर्तमान परिस्थिती बदलली तर या विचारधारेतही रास्त बदल व्हायला हवा हा समजूतदारपणा जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांस दाखवता आला म्हणून त्यांचे कौतुक. हे धोरणबदलाचे धैर्य दाखवल्याबद्दल समस्त बुंडेश्टॅगने आपले पक्षीय भेदाभेद दूर ठेवून अध्यक्ष ओलाफ शोल्झ यांस उभे राहून मानवंदना दिली. हा सर्वपक्षीय समजूतदारपणाही लोभस. शोल्झ यांची आघाडी अलीकडेच सत्तेवर आली. ग्रीन पार्टी, फ्री डेमॉक्रॅटिक पार्टी आणि सोशल डेमॉक्रॅट अशा तीन पक्षांचे हे आघाडी सरकार. यातील ग्रीन्सचा युद्धास विरोध आणि सोशल डेमॉक्रॅट्स हे रशिया आणि म्हणून पुतिनधार्जिणे. पण या दोघांनीही आपापल्या विचारधारा बाजूला सारल्या आणि पुतिन यांच्या दांडगाईविरोधात ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.

त्याचे हरखून जावे असे प्रतििबब बर्लिनमध्येही ठसठशीतपणे समोर आले. एक लाखांहून अधिक नागरिक रविवारच्या सायंकाळी पुतिन यांचा निषेध करण्यासाठी त्या शहराच्या केंद्रस्थानी जमले होते. पुतिन यांनी गेल्या आठवडय़ात युक्रेनवर हल्ला केल्यापासून गेल्या चार दिवसांतील हे सर्वात आश्वासक दृश्य. वास्तविक पुतिन यांच्या महत्त्वाकांक्षी वायुवाहिनी प्रकल्पांचा जर्मनी हा सर्वात मोठा लाभधारक. दशकभरापूर्वी जपानमध्ये फुकुशिमा अपघात घडल्यावर जर्मनीने आपले सर्व अणुऊर्जा प्रकल्प बंद केले. त्यामुळे तेव्हापासून त्या देशास तीव्र ऊर्जाटंचाई भेडसावू लागली. संपूर्ण युरोपात इंधन सर्वाधिक महाग आहे ते जर्मनीत; त्यामागील कारण हे. या ऊर्जा समस्येवर रशियातून येणाऱ्या वायुवाहिन्या हा मोठा तोडगा. त्याचा प्रकल्प माजी चॅन्सेलर अँगेला मर्केल यांच्या काळात आखला गेला आणि त्याचा पहिला टप्पा पूर्णही झाला. सध्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे. पूर्ण झाल्यास या प्रकल्पाचाही सर्वात मोठा लाभधारक जर्मनीच असेल. पण म्हणून आपण रशियाचे आणि म्हणून पुतिन यांचे मिंधे राहायला हवे, ही भावना जर्मन सत्ताधीशांत नाही. ‘पुतिन यांच्यामुळे आपले भले होत असेल तर कशाला बोला त्यांविरोधात’ अशी मध्यममार्गी लबाडीच मुत्सद्देगिरी म्हणून खपवण्याचे चातुर्यही जर्मन राजकारण्यांत नाही. सर्व सोयीस्कर हिशेबीपणा हा राजकारणाचा वा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा महत्त्वाचा आणि निर्णायक घटक ठरत असताना जर्मनीचा हा धोरणबदल निश्चितच स्वागतार्ह आणि दखलपात्र ठरतो.

वास्तविक माजी चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनीही याच गुणाचे दर्शन घडवले होते. त्या चॅन्सेलर झाल्या २००५ साली. त्याआधी पाच वर्षे व्लादिमीर पुतिन हे रशियाचे अध्यक्ष बनले. पुतिन हे मुळात केजीबी या रशियन गुप्तहेर संघटनेचे प्रमुख. त्या नात्याने त्यांस मर्केलबाईंच्या स्वभावातले कच्चे दुवे २००७ साली या दोघांतील पहिल्या भेटीआधी पूर्ण ठाऊक होते. लहानपणी घडलेल्या काही घटनांमुळे मर्केलबाईंच्या मनात अनोळखी कुत्र्यांविषयी एक प्रकारची भीती होती. पुतिन यांना हे ठाऊक असल्याने सोची येथे मर्केलबाई पहिल्यांदा जर्मनी-रशिया चर्चेसाठी आल्या असता पुतिन यांनी आपला भलाथोरला काळा लॅब्रेडोर जातीचा कुत्रा सतत दोघांभोवती घुटमळत राहील अशी व्यवस्था केली होती. हा सरळ दुष्टपणा होता. पण असे काही पुतिन करणार याची कल्पना असल्याने मर्केलबाईंनी त्या कुत्र्याच्या चर्चेतील अस्तित्वाची दखल घेतली नाही. स्वत: मर्केल यांनीच काही वर्षांनी हा प्रकार उघड केला. त्यानंतरही वायुवाहिनी प्रकल्पाची बोलणी आणि अंमलबजावणी सुरू आहे म्हणून मर्केल यांनी कधीही अन्याय्य बाबींसाठी पुतिन यांस बोल लावणे टाळले नाही. पाच वर्षांपूर्वी २०१७ साली म्युनिक येथील ‘जी२०’ परिषद असो वा २०१८ साली आंतरराष्ट्रीय मंचावर पुतिन यांच्याविषयी भाष्य करणे असो. मर्केल यांनी पुतिन यांस चार शब्द सुनावणे काही सोडले नाही. इतकेच काय पण गतसाली पुतिन यांचे कडवे राजकीय विरोधक अलेक्सी नावाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाला असता त्यांस जर्मनीत आणवून उपचार करण्याची िहमत आणि धडाडी मर्केल यांच्या नेतृत्वाखालील जर्मनीने दाखवली.

त्यामुळे पुतिन यांनी युक्रेनमध्ये केलेल्या घुसखोरीनंतर सुरुवातीस काही काळ जर्मनीने पाळलेले मौन त्या देशाच्या निर्धाराविषयी संशय निर्माण करणारे होते. वास्तविक युक्रेनला संरक्षणाची हमी देणाऱ्यांत जर्मनी नाही. पण तरीही या मुद्दय़ावर जर्मनीकडून काही ठाम भूमिका आणि कृती अपेक्षित होती. याचे कारण युरोप खंडात आज सर्वात सक्षम आणि सधन देश हा जर्मनीच आहे आणि युक्रेन हा देश युरोपचा भाग आहे. पण त्या वेळी जर्मनीऐवजी रशियाविरोधात आवाज सर्वात आधी उठवला तो ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी. त्या मुद्दय़ावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या कृतीतही सुरुवातीस एक प्रकारचा संथपणा होता. हे सर्व निष्क्रिय भासत असताना जर्मनीच्या निष्क्रियतेस स्वार्थ हेतू जोडला गेला. कारण अर्थातच रशिया-जर्मनी ही प्रचंड क्षमतेची वायुवाहिनी. पुतिन यांच्या अर्थधोरणाचा सर्वाधिक फायदा जर्मनीस होत असल्याने त्यांच्या कृतीकडे जर्मनी काणाडोळा करीत असल्याचा संशय व्यक्त केला गेला. 

तथापि जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्या कृतीने हा तटस्थतेचा तवंग आता दूर होऊन ठाम निर्णयाचा प्रवाह वाहू लागेल. शोल्झ सरकार केवळ पुतिन यांच्याविरोधात शब्दभूमिका घेऊन थांबलेले नाही, तर त्यांनी युक्रेन देशास रशियाविरोधात लढण्यासाठी शस्त्रसामग्रीही पुरवण्याचा निर्णय घेतला. या युद्धाच्या परिणतीसाठी हा निर्णय अत्यंत दूरगामी ठरू शकतो. आपल्या युक्रेनी दांडगाईविरोधात अमेरिका फार काही करणार नाही, युरोप फार काही करू शकत नाही आणि जर्मनी करू शकत असूनही फार काही करणार नाही, हा व्लादिमीर पुतिन यांचा समज जर्मनीने पार धुळीस मिळवला. आपल्या सर्व कृत्यांचा सर्वाधिक फायदा जर्मनीस होणार असल्याने तो काही आपल्या विरोधात उभा राहणार नाही, असा पुतिन यांचा कयास असणार. जर्मन बुंडेश्टॅगमध्ये जे काही घडले त्यातून तो किती चुकला हे कळून येईल. याच्या जोडीने सामान्य जर्मन नागरिकांनीही पुतिन यांच्या विरोधातील संतापाचे जे दर्शन घडवले तेही हृद्य म्हणायला हवे. पोलंड, हंगेरी आदी अनेक शेजारी देशांस युक्रेनी स्थलांतरितांस सहन करावे लागत आहे. पण तरीही हे देश आनंदाने ही जबाबदारी स्वीकारताना दिसतात. अनेक देशांनी युक्रेनी स्थलांतरितांचे खुल्या मनाने स्वागत केले आहे आणि त्यांच्यासाठी मदतकेंद्रे उभी केली आहेत. हे सारे युरोपविषयी अभिमान निर्माण करणारेच.  मानवतेचा कलंक असा हुकूमशहा ज्या भूमीतून जन्मास आला त्या भूमीनेच मानवतेच्या आणि लोकशाहीच्या रक्षणार्थ उभे राहावे हा बदल शिकायचे असलेल्यांस बरेच काही शिकवणारा ठरतो. म्हणून; धोरणे ही कालसुसंगत बदलासाठीच असतात आणि म्हणून धारणा बदलली की ती बदलायला हवीत या जर्मन परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानाचे महत्त्व.

No comments:

Post a Comment