जगभरातून रशियाला विरोध होत असला तरीही पुतिन यांच्या अहंकारामुळे वातावरण चिघळण्याचीच शक्यता अधिक आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याला दोनेत्स्क आणि लुहान्स्क या बंडखोर प्रांतांना देण्यात आलेली मान्यता हे वरवरचे कारण असले तरी ऊर्जास्रोत बळकावण्याचे रशियन धोरण लपून राहिले नाही. राष्ट्रहित जपण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की हेदेखील रशियाविरोधी भूमिका घेताना कधीही डगमगले नाहीत. युक्रेनने युरोपियन राष्ट्रांचे अनुकरण करणे हे पुतीन यांच्यासाठी असह्य होत असले तरीही युक्रेनवर दबाव आणताना रशियाला इतर युरोपियन राष्ट्रे तसेच अमेरिका यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. रशियाची एकाधिकारशाही मोडीत काढणे हेच खरे आव्हान आहे. चीन, रशिया या राष्ट्रांनी स्वत:च्या स्वार्थापायी आपल्या शेजारील भूभागावर नेहमीच वर्चस्व अधोरेखित केले आहे. अमेरिका तसेच आता चीन आणि जर्मनी यांची बदलती भूमिका पुतिन यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विनासायास दीर्घकाळचे अध्यक्षपद लाभल्यापासून त्यांची यशोकमान सातत्याने चढती राहिली आहे. चढत चढत उंच डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर दुसऱ्या बाजूने खाली येण्याशिवाय त्यांच्याकडे अन्य असा पर्यायच उरला नाही. त्यांचा आता युक्रेनवर हल्ल्याचा डाव म्हणजे शुद्ध वेडाचारच होय. अमेरिकादी नाटो शत्रू राष्ट्रांचे तर सोडाच पण चीन – भारत वगैरे मित्रराष्ट्रांचा हितकारक सल्ला ऐकण्याच्या मन:स्थितीतसुद्धा ते नाहीत. पुतिन यांची ही ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ तर नाही ना !
लोकशाहीच्या नावाखाली रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांची एकाधिकारशाही आणि अधोगतीकडे चाललेली वाटचाल याबद्दलचा यथायोग्य विवेचन करणारा ‘पैचा शहाणा अन्..’ हा अग्रलेख वाचला. यश मिळविण्यापेक्षाही ते पचवणे फार कठीण असते. तेव्हा हे डोक्यात गेल्यावर काय होऊ शकते याचे पुतीन हे जिवंत उदाहरण आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्याची घोषणा झाल्याच्या काही तासातच पूर्व युक्रेनच्या बंडखोरांनी दोनेत्स्क आणि लुहान्स्क यांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. या ताज्या तणावाच्या सुरुवातीपासूनच रशिया युक्रेनवर हल्ला करण्याचे सर्व दावे फेटाळून लावत असला तरी संभाव्य तिसऱ्या महायुद्धाची भीती जगात निर्माण झाली आहे. दोन महायुद्धांची भीषणता पाहणाऱ्या जगासाठी आता तिसरे महायुद्ध होऊ नये हेच चांगले आहे. दहशतवाद, गृहयुद्धे, फुटीरतावाद, अतिरेकवाद, तसेच वातावरणातील बदलासारख्या संकटांमुळे झालेला विध्वंस आणि आता जगाच्या विविध भागांमध्ये पसरलेली कोरोना महामारी ही युद्धापेक्षा कमी नाही.
No comments:
Post a Comment