राष्ट्रनिर्मितीमध्ये राष्ट्रजीवनाचे तत्त्वज्ञान फार महत्त्वाची भूमिका बजावते. कोणत्याही नवदेशाच्या उभारणीत हे तत्त्वज्ञान त्या मातीतूनच उगवलेले असणे अपेक्षित असते. एकात्म मानवतावादाकडे त्या दृष्टिकोनातून पाहता येते.
एकात्म मानववादावरील पहिल्या लेखात आपण दीनदयाळजी, एकात्म मानववादाची पाश्र्वभूमी, त्याची वैशिष्टय़े व मूलभूत सूत्रे पाहिली.
तत्त्वज्ञान, दर्शन, कल्पनाप्रणाली
एकात्म मानववादातील वाद हा वादविवादातील वाद किंवा न्यायदर्शनातील वाद नव्हे. कल्पनाप्रणालीला (आयडॉलॉजी) वाद शब्द रूढ झाला आहे, जसे समाजवाद, जडवाद. वास्तविक पाहता एकात्म मानववाद ही कल्पनाप्रणाली नसून भारतीय परंपरा व चिंतनातून आलेले, त्यावर आधारित, आजच्या काळाला अनुरूप राष्ट्रीय तत्त्वज्ञान आहे. त्यावेळी वाद हा शब्द खूप प्रचलित होता व मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नवमानवतावादाच्या तुलनेत एकात्म मानववाद असे सुरुवातीस म्हणण्यात आले. पण या तत्त्वज्ञानाची व्यापकता लक्षात घेऊन विचारकांनी त्याचे पुढे एकात्म मानव दर्शन असे नामकरण केले.
तत्त्वज्ञान म्हणजे सार वस्तूचे यथार्थ ज्ञान. आपल्या तत्त्वज्ञानात व्यक्ती व जग तसेच त्यांचे मूळ स्वरूप असलेले आत्मा व ब्रह्म यांचे यथार्थ ज्ञान. चिंतन व अनुभवसमृद्धीतून तत्त्वज्ञानात नवा गर्भितार्थ भरला जातो, तर वाद हा साधारणत: प्रवाही नसून साचेबंद असतो.
आपल्या संस्कृतीत तत्त्वज्ञान केवळ बौद्धिक विलास नसून त्यामध्ये ज्ञानसाधना मार्ग सांगणे तसेच त्या तत्त्वाची प्रत्यक्ष अनुभूती प्राप्त करणे हेही आवश्यक मानले आहे. पारमार्थिक व व्यावहारिक यात विरोध नसून ही साधनेची बरोबर चालणारी अंगे आहेत हा संस्कारही दिला आहे. तत्त्वज्ञानातून मूल्यांची निर्मिती होते, मूल्यातून ध्येय व ध्येयातून सामाजिक जीवनाची. तत्त्वज्ञानाला हिंदूीत दर्शन म्हणतात. दर्शन या शब्दाने आत्म्याचा साक्षात अनुभव आणि त्या अनुभवाची तर्कशुद्ध संगतवार मांडणी (तात्त्विक आकृतिबंध) असा दुहेरी अर्थ सूचित होतो.
राष्ट्रीय तत्त्वज्ञानाची आवश्यकता
कम्युनिझम कोसळो अथवा भांडवलशाही संकटात येवो, त्यातून आपला प्रश्न सुटत नाही. राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी, आपल्या सुयोग्य विकासासाठी राष्ट्रीय तत्त्वज्ञान आवश्यक असते. पारतंत्र्यामध्ये समाजाचे ‘स्वत्व’ दाबले जाते. यामुळेच राष्ट्र स्वातंत्र्याची अभिलाषा धरते, की ज्यामुळे स्वत:ची प्रकृती व गुणधर्म यांनुसार प्रयत्न करून सुख अनुभवू शकू.
काही राजकर्ते व नोकरशहा यांना परदेशी तज्ज्ञांनी भुरळ घातलेली दिसते व त्याप्रमाणे ते येथील धोरणे व व्यवस्था आखतात, तर काहींना वाटते की तत्त्वज्ञान वगैरे गोष्टींची आवश्यकता नसून सुशासनाच्याच (गुड गव्हर्नन्स) आधारावर आम्ही महान होऊ शकू. राष्ट्रजीवनाच्या तत्त्वज्ञानाशिवाय राष्ट्र पुनर्निर्माण प्रक्रियेच्या मार्गावर आपण भरकटू शकतो. उदा: इंदिरा गांधींची धोरणे १९६६ ते १९७६ पर्यंत जशी होती, १९८० नंतर त्याउलट बनली. प्रथम आयात पर्यायांचा शोध (पोर्ट सबस्टिटय़ूशन), मग आयातीत ढील व आता पुन्हा आत्मनिर्भरतेची घोषणा; प्रथम आर्थिक बाबतीत देशात चीनचे वर्चस्व वाढू देणे व आता त्याला वेसण घालण्याचा प्रयत्न करणे; असा आमचा प्रवास लडखडत चालू आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची सरकारे ही तरुण व कर्तृत्ववान व्यक्तींच्या पुरुषार्थास जागृत करून, त्यांना राष्ट्रपुनर्निर्माणाच्या कार्यात जोडण्यात फार यशस्वी झालेली नाहीत. अशी प्रेरणा तर आपली संस्कृती, राष्ट्रभक्ती, उच्चतर ध्येयासक्ती, आणि ध्येयपथावर नि:स्वार्थीपणे मार्गक्रमण करण्यातून मिळत असते. म्हणून राष्ट्रपुनर्निर्माणासाठी राष्ट्रजीवन हा त्यासाठीच्या तत्त्वज्ञानाचा आधार असायला हवा.
विविध सामाजिक क्षेत्रांची रचना ही राष्ट्रीय सांस्कृतिक सामर्थ्य व त्यावर आधारित जीवनदृष्टीस अनुरूपच असायला हवी. अशी अधिष्ठानरूपी जीवनदृष्टी नसेल तर त्याअभावी विकसित होणाऱ्या समाजजीवनातील कोणतीही व्यवस्था, रचना इ. आत्मविसंगत होऊन फार काळ टिकत नाही. वेगवेगळय़ा सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या नागरिकांकरिता कार्यक्रमांमध्ये सैद्धांतिक सूत्र हवे व त्यावर आधारित दिशादर्शन मिळायला हवे. या दृष्टीनेदेखील राष्ट्रजीवन तत्त्वज्ञान महत्त्वाचे आहे.
एकात्म मानव दर्शन सर्वाचे
दीनदयाळजींनी कधी एक नवे दर्शन मांडल्याचा दावा केला नाही. आपल्या भारतीय राष्ट्रीय चिंतनाचे युगानुकूल स्वरूप म्हणजे एकात्म मानव दर्शन हाच त्यांचा भाव होता. याला सनातन धर्माचा युगानुकूल आविष्कार (आजच्या काळाला अनुरूप असे सादरीकरण) असे म्हणता येईल. आपल्याकडे हा शाश्वत आणि युगानुकूल बोध आहे. आदिशंकराचार्यानीही नवे तत्त्वज्ञान न म्हणता प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहिली.
या दृष्टीने एकात्म मानव दर्शन हे केवळ दीनदयाळजी वा जनसंघ यांचे नाही तर ते सर्वाचे राष्ट्रीय दर्शन आहे. तसेच दीनदयाळजींच्या मांडणीपुरतेच हे मर्यादित ठेवू नये तर आजच्या आवश्यकतेनुसार शाश्वत तत्त्वांच्या प्रकाशात आम्ही विषयविस्तार केला पाहिजे. भारतीय चिंतनावर आधारित सर्व विचारप्रवाह आपल्या आपल्या पद्धतीने या राष्ट्रीय दर्शनास बळ देत आहेत. स्वामी विवेकानंद, योगी अरिवद, महात्मा गांधी, विनोबजी, डॉ. आंबेडकर इ.चे विचार यात आवश्यक तसे आलेले आहेत व नव्या सुयोग्य, सानुकूल विचारांचा समावेश मूळ सूत्रानुसार पुढेही होऊ शकतो.
मूलभूत तत्त्वसूत्रे
एकात्म मानव दर्शनाच्या मूलभूत सूत्रांचा उल्लेख पहिल्या लेखात झाला. ती भारतीय चिंतनाची सखोलता व वेगळेपण दर्शवितात. त्यांचे संक्षिप्त स्पष्टीकरण पाहूया.
वैश्विक एकात्मता :
हिंदूू जीवनदृष्टीनुसार अस्तित्वाचे सारे आविष्कार एकाच चैतन्यतत्त्वातून विकसित होतात. त्यामुळे विविधतेने संपन्न अशा विश्वाच्या उलाढालीत सगळय़ा घटकांत मुळात एकात्मता आहे. ही एकात्मता दोन पातळय़ांवर दिसून येते – आत्मिक स्तरावर मूलभूत एकात्मता व सृष्टीच्या पातळीवर वेगवेगळय़ा घटकांमध्ये आढळणारी जैविक एकात्मता.
वैयक्तिक आत्मिकतेकडून वैश्विक आत्मिकतेपर्यंत उन्नयन :
स्वानुभूतीस व्यापक व उन्नत करणे हा मनुष्याचा मूलभूत स्वभाव आहे आणि शरीर-मन-बुद्धीच्या पलीकडे जाऊन आपल्या आत्मिक ज्ञानाचा विस्तार करणे हे आध्यात्मिक ज्ञान होय. ज्ञानाची कक्षा माणसाच्या संवेदनशीलतेने व्यापक होत जाते व भोवतालचा परिसर ते सगळय़ा समाजापर्यंत हा आत्मीयतेचा अनुभव येत जातो. याचप्रमाणे एकच चैतन्यतत्त्व सगळीकडे भरलेले आहे या मूल्याचा योग्य साक्षात्कार होताच ही आत्मीयतेची भावना सृष्टीपर्यंत पोहोचते आणि अखेरीस प्रत्यक्ष सृष्टीच्या मुळाशी असलेल्या या चैतन्यामुळे परमेष्ठीशी एकरूप होण्याची क्षमता माणसामध्ये विकसित होते. अशा प्रकारे, आत्मानुभवातून वैश्विक एकात्मतेपर्यंत माणसाचा आत्मिक विकास होऊ शकतो, अशी हिंदूू जीवनदृष्टीची धारणा आहे. व्यक्ती – समष्टी – परमेष्ठी अशी उत्तरोत्तर उच्च पातळीवरील अनुभूती प्राप्त होते.
त्रिगुणात्मकता :
स्थूल सृष्टीमध्ये सतत बदल हेच शाश्वत तत्त्व आहे. सत्त्व (प्रकाश, ज्ञान), रज (क्रियाशीलता) व तम (आळस, जडता) हे तिघेही आपसांत अनेक संमिश्र रूपे निर्माण करतात, ज्यांच्यामुळे या सृष्टीचे स्वरूपही सतत बदलत राहते.
माणसाचे शरीर, मन व बुद्धीदेखील याच सत्त्व-रज-तम त्रिगुणांचे मिश्रण होय. त्यातून व्यक्त होणाऱ्या वेगवेगळय़ा प्रवृत्तींच्या अनुषंगानेच त्यांना योग्य दिशा देणाऱ्या, ताब्यात ठेवणाऱ्या तसेच उन्नयन करणाऱ्या सामाजिक संस्थांची निर्मिती व त्यांचे संचालन करणे आवश्यक आहे.
चतुर्विध मानवी व्यक्तिमत्त्व :
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे शरीर-मन-बुद्धी-जीवात्मा या चार मिती म्हणजे चार अगदी निरनिराळे पैलू नसून, या चार गोष्टी मिळून व्यक्तिमत्त्व आहे. व्यक्ती व समाजाने एकात्म मानवी व्यक्तिमत्त्वाचे हे चतुर्विध स्वरूप लक्षात घेऊनच मनुष्यजीवनाची नीट व्यवस्था लावायला हवी.
पुरुषार्थ चतुष्टय़ :
पुरुषार्थ म्हणजे आपल्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी केलेला व्यष्टिगत वा समष्टिगत समग्र प्रयत्न. या संकल्पनेमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पैलू आहेत. या पैलूंचा हा विशिष्ट क्रम असण्यामागे खास अर्थ आहे. अर्थ व काम हे धर्मानुसार असायला हवेत. अर्थात ते सामाजिक नीतीच्या मर्यादेत हवेत. अशा धम्र्य सुखसाधनामुळे व्यक्तीला स्वत:चे सुख, समाजहित व निसर्ग यांत संतुलन साधून शाश्वत निरामय आनंद तसेच अंतिम जीवनसाफल्य मोक्ष प्राप्त करता येऊ शकतो.
छान
ReplyDelete