दुसऱ्यावर प्रेम करता येत नसेल तर ते करूही नये, पण मग त्याबरोबरच निदान दुसऱ्याचा विखारी द्वेष तरी करू नये!
दरवर्षी १४ फेब्रुवारीला नेमेचि येणाऱ्या व्हॅलेंटाइन डे नामक दिनविशेषाला आपल्याकडे सुरुवातीला सणकून विरोध झाला असला तरी प्रेमाइतकीच बाजारपेठेचीही ताकद मोठी असल्यामुळे आता तो चांगलाच रुजला आहे. त्यामुळे आजकाल फेब्रुवारी महिना उजाडायच्या आधीपासूनच बाजारपेठेने गोडगुलाबी वातावरणनिर्मिती करायला घेतलेली असते. प्रेम करण्याची आणि ते फुले, शुभेच्छापत्रे, चॉकोलेट्स आणि तत्सम भेटवस्तू यांच्या माध्यमातून व्यक्त करण्याची हिंमत असणाऱ्यांची लगबग उडून गेलेली असते. करोना महासाथीच्या काळातील गेल्या दोन वर्षांचा अपवाद वगळता या काळात महाविद्यालयांच्या परिसरामधले वातावरण अगदी लोभस असते.
होय, लोभसच! कारण प्रेम करणे हीच मुळात लोभस गोष्ट आहे. ते कुणीही करावे, कुणावरही करावे, कशावरही करावे, अगदी जिवापाड करावे हे तर कवी मंडळींनी सांगूनच ठेवलेले आहे. पण हाच धागा पुढे न्यायचा तर आपण संत व्हॅलेंटाइन यांनी सांगितलेला हा प्रेमदिवस आणखी व्यापक करायला काय हरकत आहे? याचे कारण म्हणजे आजकाल कुठेकुठे फक्त स्त्री-पुरुषांमधल्या प्रेमाच्याच बाबतीत नाही, तर एकुणात माणसामाणसांमधल्या प्रेमाच्या बाबतीत थोडे वेगळे घडते आहे.
समाजात डोकावून बघितले आणि हल्ली अपरिहार्य होऊन बसलेल्या समाजमाध्यमी कट्टय़ांवर जरा चक्कर मारली तर त्याची विविध रूपे बघायला मिळतात. प्रेमही इतके जिवापाड करायचे की ती व्यक्ती आपल्याला मिळत नसेल तर थेट तिला अंगावर पेट्रोल ओतून जाळूनच टाकायचे हा प्रेमाचा टोकाचा हिंस्र प्रकार दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट या निमशहरात घडला. त्यातील संबंधित आरोपीला परवाच आजन्म कारावास सुनावला गेला आहे. बहिणीने जातीबाहेर लग्न केले म्हणून नाही, तथाकथित ‘लव्ह जिहाद’लाही बळी पडली म्हणूनही नाही, तर जातीतच पण प्रेमविवाह केला म्हणून आईच्या प्रोत्साहनाने थेट तिचे शीरच धडावेगळे करण्याचे मराठवाडय़ातले अमानुष प्रकरण जेमतेम दोन- तीन महिन्याभरापूर्वीचे. कदाचित थेट इतकी टोकाची तीव्रता नसलेले, पण खरोखरच विखारी असेही आपल्या आसपास इतरही बरेच काही सतत घडते आहे. कुणी काय खावे, कुणी काय ल्यावे, कुणी काय गावे, कुणी कुणाला पुजावे, कुणी कुणाबरोबर असावे आणि कुणाबरोबर नसावे असे बरेच काही ज्याचे त्याचे व्यक्तिगत असलेले चव्हाटय़ावर येऊन समाजातील वेगवेगळय़ा समूहांच्या द्वेषाचे कारण कसे होऊ शकते? पण तसे घडते आहे.
एखादे माणूस, एखादी वृत्ती, एखादी कृती, एखादा विचार न आवडणे, त्याला विरोध करणे हे समजण्यासारखे आहे, पण या नावडीचा समाजमाध्यमांवर जो जल्पकी हल्ला होतो तो खरोखर आकलनापलीकडचा आहे. २०२१च्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरोधातील पराभवानंतर मोहम्मद शामीला ट्रोल करणे, ते कमी म्हणून की काय कप्तान विराट कोहलीच्या एकवर्षीय मुलीवरच बलात्काराची धमकी दिली जाणे ही याची अगदी ताजी उदाहरणे. आपल्यापेक्षा वेगळय़ा धर्मातील स्त्रियांची छायाचित्रे एखाद्या अॅपवर डकवून, या महिलांचे संपर्क क्रमांक त्यांच्या संमतीविना सार्वजनिक करून, त्या लिलावासाठी उपलब्ध असल्याचे जाहीर करणे हेदेखील असेच उदाहरण. स्त्री-पुरुषांच्याच नाही तर माणसामाणसांमधल्या प्रेमाची मर्यादा आपण घालवून बसलो आहोत, हेच त्यातून दिसते. प्रेम केल्याने वाढते, तसाच द्वेषदेखील केल्याने वाढतो. माणसांच्या मनात हा द्वेष पेरणारे ‘करविते धनी’ वेगळे आहेत आणि त्यांनी जे पेरले आहे, तेच वेगवेगळय़ा मार्गानी उगवते आहे हे जितके खरे; तितकेच, या सगळय़ा भयंकर असुंदराच्या डोळय़ात डोळे घालून बघितल्याशिवाय आता कुणाचीच सुटका नाही, हेदेखील तितकेच खरे. तसे बघू तेव्हाच प्रेम किती सुंदर आणि लोभस आहे आणि ते कुणावरही करता येते ते कळेल.
स्त्री-पुरुषांमधले प्रेम हा प्रेमाचा जगातला सगळय़ात आदिम, मूलभूत आविष्कार असला तरी मानवी संस्कृतीने सगळय़ाच आदिम गोष्टींना काळानुरूप नवे आयाम दिले आहेत. मायलेकराचे प्रेम, बापलेकीचे प्रेम, भावंडांचे प्रेम, आजीनातवंडाचे प्रेम, काकापुतण्याचे- मामाभाच्याचे प्रेम, आत्यामावशांचे प्रेम या सगळय़ा कौटुंबिक लिप्ताळय़ाच्या पलीकडेही प्रेमभावनेचे विविध आविष्कार जगातल्या सगळय़ाच संस्कृतींमध्ये पाहायला मिळतात. एक भिंत पलीकडे राहाणारे शेजारी, जिवाला जीव देणारी मित्रमंडळी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, कुठेतरी भेटलेले पण कायमचे सुहृद होऊन गेलेले सहप्रवासी, ऑनलाइन असणारी इतर देशांमधली माणसे.. आजच्या सामान्य माणसाच्या जिव्हाळय़ाचा परीघ असा आणि याहूनही कितीतरी मोठा आहे. आपल्या जिवाभावाच्या माणसांमध्ये जमावे, खावे-प्यावे, गळय़ात गळे घालून एकमेकांची सुखदु:खे ऐकावीत, वेळप्रसंगी एकमेकांच्या खांद्यावर मान ठेवत सहवेदना जागवावी आणि या सगळय़ातून आनंदाने जीवनगाणे गावे हेच आणि एवढेच त्याला हवे असते. त्याची त्याची भांडणे असतात, वैर असते, शत्रुत्व असते, नाही असे अजिबातच नाही. ते असणे आणि त्यासह जगणे हे मानवी आहे. अमानवी, अमानुष आहे ते दुसऱ्याचे अस्तित्व, त्याची ‘स्पेस’ नाकारणे; पंतप्रधानांपासून ते घरी पेपर टाकणाऱ्या मुलापर्यंत सगळय़ांची मते, विचार हे माझ्या विचाराशी जुळणारे असले पाहिजेत असा आग्रह धरणे. हा आग्रह हेच समाजातील आजच्या द्वेषाचे कारण आहे.
वेगळे विचार, वेगळय़ा जीवन पद्धती, वेगळय़ा उपासना पद्धती, वेगळय़ा आचरण पद्धती, वेगळय़ा आहार पद्धती, वेगळी माणसे आपल्या भवताली आहेत, असणार आहेत; आपले आणि त्यांचे मतभेदही असणार आहेत आणि तरीही ते स्वीकारून त्यांच्यासह आपल्याला जगायचे आहे, आपले काही त्यांना द्यायचे आहे आणि त्यांचेही काही स्वीकारायचे आहे याचे भान असणे म्हणजे प्रेम असणे. अगदी असेच प्रेम स्त्री-पुरुषांमध्येही असते कारण तिथे निसर्गच दोन अगदी भिन्न स्वरूपाच्या, भिन्न स्वभावाच्या माणसांना, जणू दोन ध्रुवांना एकत्र आणत असतो. इतरांना सामावून घेणारे अगदी असेच प्रेम कुणाही माणसांवर करता येते हे आपल्या पूर्वजांनी गेली हजारो वर्षे त्यांच्याच उदाहरणातून दाखवून दिले आहे.
आजच्या गोष्टी कदाचित कालानुरूप वेगळय़ा असतील, पण दोन माणसांमध्ये, दोन गटांमध्ये, दोन समूहांमध्ये पराकोटीचा विखार, जीवघेणा द्वेष, त्वेष, अंगार, संताप असू नये. विचारांचे भांडण विचारांनीच करावे, शिव्याशापांनी किंवा हातात दगड उचलून करू नये. कुणी कुणाचे खाणेपिणे काढू नये. कुणाचा पेहराव, जात-धर्म यावरून टोकाला जाऊ नये. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे असे वागू नये. आपणही जगावे आणि दुसऱ्यालाही जगू द्यावे. हे सगळे वागणे म्हणजेच स्वत:वर प्रेम करणे आहे आणि दुसऱ्यावरही प्रेम करणे आहे. संत व्हॅलेंटाइनला प्रेमदिवसाच्या निमित्ताने फक्त स्त्री-पुरुषांचे प्रेम साजरे करणे अपेक्षित असेलही, पण आपण त्या पुढे जायला काय हरकत आहे? हे कुणाला पुस्तकी आदर्श वाटतीलही कदाचित; पण ते आणखी सोपे करून सांगायचे तर दुसऱ्यावर प्रेम करता येत नसेल तर ते करूही नये, पण मग त्याबरोबरच निदान दुसऱ्याचा विखारी द्वेष तरी करू नये. दर शब्दाला मोजून पैसे घेऊन समाजमन नासवणाऱ्या जल्पकांच्या टोळय़ांना आपापल्या पातळीवर तरी बळी पडू नये. नामदेव ढसाळांच्या ‘माण्साने’ या कवितेच्या ओळींमध्ये थोडा बदल करून सांगायचे तर माण्सावर माण्सासारखेच प्रेम करावे माण्साने..
No comments:
Post a Comment