कर्मवीर एज्युकेशन

कर्मवीर एज्युकेशन या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , MAHESH PATIL 7387125608 .

Motivational Video

Tuesday, January 25, 2022

अग्रलेख : कुडकुडते प्रजासत्ताक!

 


घसरलेले तापमान आणि झोंबणारे वारे यांमुळे होणारी अवस्था आजघडीला आपल्या देशात अनेक ठिकाणी दिसू लागलेली आहे.

हवामान बदलाचे दुष्परिणाम काय असतील ते असोत. पण एक सुपरिणाम मात्र निश्चितच नोंदवायला हवा. तो म्हणजे सर्वत्र लांबलेली थंडी. मुंबईत तर ती सध्या इतकी पडलेली आहे की एका मोठय़ा नेत्याच्या म्हणण्यानुसार लवकरच आपल्याकडे हिमअस्वले – पोलर बिअर-  रस्त्यावर हिंडताना दिसतील आणि त्यावरूनही श्रेयवाद सुरू होईल. तर दुसऱ्याच्या मते या थंडीमुळे राणीच्या बागेतल्या पेंग्विन्सना माहेरी असल्यासारखे वाटू लागेल आणि मग त्यांना येथे आणण्याच्या निर्णयात किती दूरदृष्टी होती याचे दावे दुसऱ्या बाजूने केले जातील. हे दावे-प्रतिदावे करणाऱ्यांच्या युक्तिवादांत तथ्य असले तरी त्याचे श्रेय मात्र या दोन्ही बाजूंस अजिबात देता येणार नाही. ते जाते हवामान बदलास. त्याचा परिचय करून दिल्यामुळे समस्त भारतवर्षांने हवामान बदलाचे ऋणी राहायला हवे. कारण सर्वसामान्य वातावरणात प्रजासत्ताक कुडकुडते आहे असे म्हटले तर देशद्रोहाचा किंवा गेलाबाजार दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखालच्या गुन्ह्याचा आरोप ठेवला जाण्याची भीती होती. आता ती नाही. या थंडीने कुडकुडत्या प्रजासत्ताकास अत्यंत वास्तववादी अर्थ दिला आहे. त्या वास्तवाच्या पृष्ठभागाखालोन हे प्रजासत्ताक कशाकशावर कुडकुडत असावे बरे याचा शोध घेण्यात तसा काही धोका नसावा. असला तरी तो क्षणभरासाठी बाजूस सारून हे काम तडीस न्यावयास हवे.

या कुडकुडण्यामागील एक प्रमुख कारण आमच्या मते थरथरणारी अर्थव्यवस्था असेच असणार. करोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडताना आमच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांनी देशाचा यापुढील अर्थविकासाचा आलेख हा इंग्रजी ‘के’सारख्या आकाराचा असेल असे भाकीत वर्तवले होते. ज्या वेळी सरकार इंग्रजीच्या रोमन लिपीतीलच (यासाठी देवभाषा संस्कृतच्या समृद्ध देवनागरी वर्णमालेतीलच एखादे अक्षर का बरे नाही?) ‘यू’ अथवा ‘व्ही’ अक्षराकाराप्रमाणे अर्थव्यवस्थेची गती असेल असे सांगत होते त्या वेळी रघुराम राजन, वृंदा गोपिनाथ हे तज्ज्ञ तसेच अन्य आमच्यासारखे लोक ‘के’ अक्षर पुढे करीत होते. अर्थविकासाची गती काहींना वर तर काहींना खालीच नेणाऱ्या ‘के’आकाराची असेल हे आता दिसू लागले आहे. हे ‘के’ फॉर कुडकुडणे असे आम्हास अभिप्रेत होते. तेच आता खरे होताना दिसते. वाढती महागाई, अमेरिकेच्या रिझव्‍‌र्ह बँकेकडून, म्हणजे फेडकडून, व्याज दरवाढ केली जाण्याची शक्यता आणि एकंदरच खासगी गुंतवणुकीची प्रतीक्षा अशी कारणे अर्थव्यवस्थेच्या या थरथराटामागे आहेत. गेले तीन दिवस भांडवली बाजारदेखील या थरथराटाचे प्रतीक बनला असून जवळपास दोनेक हजार अंकांनी या बाजाराचा निर्देशांक गडगडला तो यामुळेच. वाढत्या थंडीमुळे गती येत नाही. त्यामुळे पाय अवघडतात आणि पडायला होते. भांडवली बाजाराच्या निर्देशांकाबाबत तेच झाले.  अर्थव्यवस्थेबरोबर देशाच्या सीमारेषेवरही मोठय़ा प्रमाणावर कुडकुड सुरू आहे. त्याची प्रमुख कारणे दोन. पहिले म्हणजे या परिसरात गेले काही दिवस होत असलेली तुफान हिमवृष्टी. ती इतकी तीव्र आहे की समग्र सीमावर्ती भागांतील दंतवैद्यकांनी आपापले दवाखाने बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला. कारण या वैद्यकांकडे येणाऱ्या रुग्णांच्या तोंडांच्या बोळक्याप्रमाणे दंतवैद्यकांच्या फडताळातील कवळय़ा, खोटे दात आदीही कुडकुडत असल्याने या वैद्यकांस काम करणे अशक्य झाले आहे. तेव्हा अशाच थरथरत्या हातांनी काम करताना उगा ‘ध’चा ‘मा’ व्हायला नको असा विचार करून दंतवैद्यकांनी आपापले दवाखाने बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात दातांची काही व्यथा उद्भवली तर आमच्यावर दात धरू नये अशी विनंती या वैद्यकांनी केल्याचे कळते. या हिमवृष्टीच्या जोडीने पलीकडील चीन या देशाचे उद्योग हेदेखील एक कारण या कुडकडण्यामागे आहे. म्हणजे चीन या परिसरात जे काही करीत आहे ते पाहून आपल्या देशनेतृत्वास संताप अनावर होत असून तो देहात मावेनासा झाल्याने हे सर्वजण क्रोधाग्नीच्या ज्वाळांनी थरथरत आहेत. हे थरथरणे हिमकालीन असल्यामुळे ते कुडकुडणे आहे असे वाटण्याची दाट शक्यता आहे.

हे तिसरे कुडकुडणे मात्र खरेखरे. ते उत्तरेत दिसून येते. त्या दिशेकडील उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड ही पुण्यभू राज्ये सांप्रतकाळी निवडणुकांत (जसे की सोयरांत वा सुतकांत) असून त्याबाबतच्या घडामोडींमुळे समस्त जनता कुडकुडताना दिसते. या प्रांतात मतदानांस अद्याप काही सप्ताह आहेत. त्याआधी जी पक्षांतराची घालमेल तेथे सुरू आहे ती पाहून लोकशाही आणि मतदार दोघांसही कापरे भरले असून आपण मत पक्षास द्यावे की उमेदवारांस याबाबत समस्तांचा संभ्रम झालेला आहे. म्हणजे पक्षास मत देऊ जावे तर ज्यांना अजिबात घेऊ नये ते त्या पक्षात दिसू लागतात आणि पक्षाकडे न पाहता व्यक्तीकडे पाहून मतदान करू जावे तर ती व्यक्ती नको त्या पक्षात जाणार. अशा वेळी नक्की करायचे काय या काळजीने मतदार कुडकुडताना दिसतात. आपल्या बोटांस नेमकी कोणास मतदान केल्याची शाई लागणार या चिंतेने या राज्यातील मतदारांची बोटे वाकडी होऊ लागल्याचे कळते. तथापि कडक थंडीच्या काळातच ही लक्षणे दिसू लागल्याने त्याचे खापर घसरत्या तापमानावर फोडले जात असल्याने राजकारण सहीसलामत सुरू आहे.

चौथा कुडकुडणारा घटक आहे तो देशातील नोकरशहांचा. केंद्र सरकार या नोकरशहांच्या नियमनांत बदल करणार असून आपापले प्रांत सोडून राजधानी दिल्लीत खाशा सेवेसी जावे लागेल या कल्पनेने देशातील समस्त नोकरशाहीस हुडहुडी भरली असून सर्वाचेच हात एकसमयावच्छेदेकरून थरथरू लागले आहेत. या थरथरत्या हातांनी आपली जिवाजी कलमदान्याची भूमिका कशी वठवणार या प्रश्नाने या नोकरशहांची झोप उडाली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे सर्व नोकरशहा तारवटलेल्या डोळय़ांनी आपापल्या कार्यालयांत येत असून या लालसर डोळय़ांसाठी वाढलेल्या थंडीस आणि ती कमी करण्याच्या उपायांस बोल लावले जात असल्याचे कानावर येते. या नोकरशहांच्या कुडकुडण्याचे सह-नुकसान (कोलॅटरल डॅमेज)  त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यास सहन करावे लागत आहे. आपला नोकरशहा दिल्लीच्या सेवेत द्यावा लागला तर आपले काय, ही या मुख्यमंत्र्यांची चिंता. म्हणजे एका अर्थी हे नोकरशहा आणि त्यांचे मंत्री हे दोघेही समान दु:खी. त्यामुळे एकमेकांच्या सहवासात ते कुडकुडणे कमी करण्याचे द्रव्योपचार ते करीत असावेत असा संशय व्यक्त होतो. समाजमाध्यमांवर विश्वास ठेवला, तर या वाढत्या थंडीने कुडकुडणारा पाचवा घटक दिवंगत नेत्यांच्या पुतळय़ांचा. यात आघाडीवर असतील ते सरदार पटेल. अतिउंचीवर हवा विरळ होते आणि ती जास्त थंडही असते. त्यामुळे सरदारांच्या पुतळय़ास सध्या या दोन्हींचा सामना करावा लागणे स्वाभाविक. त्यांच्या या वेदना कमी करण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून सुरू आहे. ‘तुम्ही पश्चिमेला गुजरातेत तरी आहात, पण मला तर दिल्लीत राजपथावर मध्यभागी उभे राहावे लागणार आहे. तुम्ही तिकडे कुडकुडलात तर कोणास कळणारही नाही, पण मला मात्र ती सोय नाही’, अशा शब्दांत नेताजींनी आपली वेदना व्यक्त केल्याचे वृत्त समाजमाध्यमांत प्रसृत झाले असून सरकारने ते नाकारल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते. अशा तऱ्हेने भारतवर्षांचे रूपांतर कुडकुडणाऱ्या प्रजासत्ताकात झाले असून एरवी प्रजासत्ताक दिनी कुडकुडणाऱ्या थंडीत राजपथावरचा प्रेक्षणीय सोहळा पाहण्याची संधी बहुश: दिल्लीवासीयांनाच मिळते. यंदा मात्र जवळपास सर्व भारतभर प्रजासत्ताक दिन कडकडणाऱ्या तोंडाने आणि कुडकुडणाऱ्या देहाने साजरा होईल. हे कुडकुडणाऱ्या प्रजासत्ताकाचे चित्र. या कुडकुडण्यामागे अन्यही काही कारणे असल्यास ज्या नेत्याने ती स्वत:च्या जबाबदारीवर शोधावीत.

No comments:

Post a Comment

माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच!

  माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच! विदा संरक्षण, नागरिकांचे खासगीपण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा गां...